प्रवेशद्वाराजवळ तपासणी
महापौर पदाची निवड प्रक्रिया असल्याने सकाळी १० वाजेपासूनच महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अधिकारी असो वा कर्मचारी आणि नगरसेवक असतील अशा सर्वांचे ओळखपत्र तपासले जात होते. ज्यांचे ओळखपत्र होते त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात होता. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील आणि पोलीस तैनात होते.
जोडीने सभागृहात दाखल
महापौर पदाची निवड असल्यामुळे कोण कोणासोबत येतो याकडे सर्वांचे लक्ष होते. कामकाज सुरु असताना माजी महापौर चंद्रकांत सोनार आणि महापौर पदाचे उमेदवार प्रदीप कर्पे सोबत आले. त्यानंतर अवघ्या काही क्षणात माजी विरोधी पक्षनेते साबीर शेख आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते कमलेश देवरे सोबत सभागृहात दाखल झाले.
जिल्हाधिकारी यांची घोषणा
महापौर पदासाठी निवडणुक प्रक्रिया घेतल्यानंतर तिन्ही उमेदवारांना किती मते मिळाली याची माहिती दिल्यानंतर सर्वाधिक ५० मते मिळाल्याने प्रदीप बाळासाहेब कर्पे यांची महापौर पदावर निवड झाल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घोषीत केले. तसे त्यांना लागलीच पत्र देखील दिले.
पोलिसांचीही नोटीस
महापौर पदाची माळ प्रदीप कर्पे यांच्या गळ्यात पडल्यानंतर मिरवणूक निघू शकते असे गृहीत धरुन मिरवणूक काढू शकत नाही, त्याला बंदी आहे अशा आशयाची नोटीस नवनियुक्त महापौर प्रदीप कर्पे यांना सभागृहातच देण्यात आली. त्यांची त्यावर स्वाक्षरी देखील घेण्यात आली.
फटाक्यांची आतषबाजी
महापौर प्रदीप कर्पे यांनी पदभार स्विकारताच त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यानंतर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सभागृहात दाखल झाले. महापालिकेच्या बाहेर हितचिंतकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.