धुळे : पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यात नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्याकडे दोंडाईचा पोलीस ठाण्याचा पदभार साेपविण्यात आलेला आहे, पण तिवारी यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्यामुळे तात्पुरता पदभार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील बाभड यांच्याकडे दोंडाईचा पोलीस ठाण्याचा पदभार आहे. बाभड यांच्याकडे सध्या शिंदखेडा पोलीस ठाण्याचाही अतिरिक्त पदभार आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात बऱ्याच घटना, घडामोडी घडलेल्या आहेत. परिणामी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन काही बदल केले आहेत. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांची दोंडाईचा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. पश्चिम देवपूर पोलीस निरीक्षक सतीष गोराडे यांची सायबर सेल पोलीस ठाण्यात बदली केली, तर त्यांच्या जागी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व काही सुरळीत सुरू असताना दोंडाईचा येथील दगडफेकीसह गोळीबाराची आणि खुनाची घटना घडल्यानंतर तडकाफडकी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली. शिंदखेडा पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्यामुळे त्यांचा पदभार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील बाभड यांच्याकडे असताना त्यांच्याकडेच दोंडाईचा पोलीस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. आता दुर्गेश तिवारी यांची नियंत्रण कक्षातून दोंडाईचा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली, पण ते रुजू होत नाही तोपर्यंत बाभड दोंडाईचा पोलीस ठाणे सांभाळतील. तसेच दोंडाईचा येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश मोरे यांची नियंत्रण कक्षात, मानव संसाधन विकास शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गायकवाड यांची दोंडाईचा पोलीस ठाण्यात तर नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.