आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 10:27 PM2020-05-15T22:27:03+5:302020-05-15T22:27:24+5:30

आरोग्य : जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचे नागरीकांना आवाहन

Dry one day a week | आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा़

आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा़

Next

धुळे : डेंग्यू ताप हा फ्ल्यूसारखा ताप आहे़ तो डेंग्यू विषाणूपासून होतो़ तो टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा़ यादिवशी घरातील सर्व भांडी मोकळी करुन घासून पुसून स्वच्छ ठेवावी़ असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे़
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो़ या आजाराने होणारे मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यास शासनाला यश आले आहे़ जिल्ह्यात विविध कारणामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते़ हा आजार डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे़ डेंग्यू संसर्गित व्यक्तीस डास चावल्यावर वरील प्रकारचा डास संसर्गित होतो़ त्यानंतर तोच डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्या व्यक्तीला डेंग्यूचा संसर्ग होतो़ डास चावल्यानंतर पाच ते सात दिवसानंतर डेंग्यू आजाराची लक्षणे दिसायला लागतात़
एडिस डासाची लांबी पाच ते सहा मिलीमीटर असते़ या डासाच्या अंगावर पांढरे पट्टे असतात़ त्यामुळे त्याला टायगर मॉस्क्यूटो असेही म्हणतात़ तो दिवसा चावतो़ वायर, छत्री, दोरी, काळे कपडे आदी लोंबकरणाºया ठिकाणी हा डास विश्रांती घेतो़ त्याची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात़ वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यातून अळी तयार होते़ त्यामुळे डास अळी असलेली भांडी घासून-पुसून स्वच्छ करावी़ जेणेकरुन पृष्ठभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील़
तीव्र ताप येणे, डोके दुखी, उलटी, अंग दुखी, डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ येणे, तीव्र पोट दुखी आणि गंभीर रुग्णास रक्तस्त्राव अशी या आजाराची लक्षणे आहेत़ एडीस डासाला रोखण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवावा़ घर आणि परिसरातील पाणी साचू शकतील अशा निरुपयोगी वस्तू नष्ट कराव्यात़ खराव टायर पंक्चर करावे़ टायरमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेण्यात यावी़ पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावेत़ झाकण नसल्यास जुन्या कपड्याने झाकून ठेवावेत़ पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकणार नाहीत़ घरावरील टाक्यांना झाकण बसवावेत़ शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी़
परिसरातील डबकी वाहती करावीत अथवा बुजवावीत़ मोठ्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडवावेत़ परिसर स्वच्छ ठेवावा़ जे कंटेनर रिकामे करता येणार नाहीत अशा कंटेनरमध्ये टेमिफॉस या अळी नाशकाचा वापर करावा़ जैविक नियंत्रण पध्दतीने डास निर्मिती होऊ न देणे, डासोत्पती स्थाने नष्ट करणे, गप्पी माशांचे संगोपन करणे, कायमस्वरुपी डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, फुटके माठ, रांजण, कुंड्या, बाटल्या, निकामी टायर आदींची विल्हेवाट लावावी़
या डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा़ वैयक्तिक सुरक्षतेसाठी झोपताना विशेषत: कीटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करावा़ डास प्रतिबंधक मलम, अगरबत्तीचा वापर करावा़ घराच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावावेत़ डेंग्यू तापाची लागण झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावून रक्ताची तपासणी करावी़

Web Title: Dry one day a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे