जिल्ह्यात काेरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असली तरी सोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तेवढेच चांगले आहे, ही समाधानाची बाब आहे. अन्य जिल्ह्यांप्रमाणेच धुळे जिल्ह्यातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होतोय. त्यावर पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे; पण सोबतच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यासाठी राजकीय मंडळी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. त्यात राज्यातील सत्ताधारी पक्षाचे जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर, शिवसेनेचे हिलाल माळी यांनी जिल्हा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवातीला झालेल्या बैठकीत सत्ताधारी असतानासुद्धा रेमडेसिविरच्या काळाबाजारासंदर्भात आवाज उठविला तसेच यावर लवकर नियंत्रण मिळविण्यासंदर्भात जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर आता त्यांच्यामार्फत रेमडेसिविर इंजेक्शनचे गरजूंना माफक दरात वाटपही करण्यात येत आहे.
रेमडेसिविरचा तुटवडा होण्यापूर्वी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, डाॅ. माधुरी बाफना यांच्यातर्फे माफक दरात रेमडेसिविर इंजेक्शनचे गरजूंना वाटप करण्यात येत होते. त्यासाठी त्यांनी जाहीर आवाहनही केले होते. त्यांच्या आवाहनानुसार अनेक गरजू रुग्णांना त्याचा लाभही झाला.
लोकप्रतिनिधींमध्ये खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी रेमडेसिविरचे गरजू रुग्णांना वाटप केले. याशिवाय त्यांनी महापालिकेमार्फत त्यांच्या कोविड सेंटर व रुग्णालयात दाखल गरजू कोविड रुग्णांना रेमडेसिविरचे इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत.
शिरपूरचे आमदार व माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी जिल्ह्यात जेव्हा रेमडेसिविरचा तुटवडा होता, त्यावेळेस शिरपूरला रेमडेसिविरचे इंजेक्शन उपब्लध करून दिले होते. तसेच शिरपूरला त्याचा काळाबाजार होऊ नये याची काळजी घेतली. शिरपूर नगरपालिकेचे काेविड रुग्णालय नसले तरी याठिकाणी हवेतून ऑक्सिजन प्लांट खान्देशात सर्वांत आधी सुरू केला होता, हे विशेष आहे.
शहराचे आमदार फारुक शहा यांनी आमदार निधीतून मृतदेह जाळण्यासाठी विद्युत शवदाहिनी मंजूर केली. रेमडेसिविर इंजेक्शन गरजू गरीब रुग्णांना उपब्लध व्हावे यासाठीही निधी दिला. ऑक्सिजनची उपलब्धता वेळेवर व्हावी यासाठी स्वत:ची एमआयडीसीतील दहा हजार चौरस फुट जागा दोन वर्षे विनामूल्य वापरण्यासाठी आणि ऑक्सिजन प्लांटसाठी आमदार निधीतून ८० लाख रुपये मंजूर केले.
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी जवाहर फाउंडेशनच्या माध्यमातून माफक दरात एचआरसीटी, कोविड टेस्ट, कोविड रुग्णांवर उपचाराचा लाभ शहरासह ग्रामीण भागातील लोकांना देण्यात येत आहे. गरीब गरजू लोकांवर मोफत उपचारही याठिकाणी केले जात आहेत.
शिंदखेडाचे आमदार माजी मंत्री जयकुमार रावल यांनीही दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयासह शिंदखेडा आणि मतदारसंघातील ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनसह अन्य वैद्यकीय सेवा लक्ष देऊन वेळेवर उपलब्ध करून दिली आहे.
याशिवाय जि. प. सदस्य व माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांनीसुद्धा आपल्या केशरानंद रुग्णालयातून कोविड रुग्णांना एचआरसीटी, कोविड टेस्ट तसेच अन्य आरोग्य सेवा माफक दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा लाभ धुळे व शिंदखेडा मतदारसंघासह जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यांतील रुग्णांना होत आहे.
याशिवाय जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटना व व्यक्तींनी आपआपल्या परीने कोविडच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी जमेल ती मदत देण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम कोविड रुग्णसंख्या वाढत असतानाही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जास्त जाणवला नाही.
मात्र, रेमडेसिविरच्या काळ्याबाजारामुळे काही काळ गोंधळ जरूर उडाला होता; पण जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने योग्य वेळेस कारवाई करून नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.
इतर जिल्ह्यांत रेमडेसिविर वाटप आणि आरोग्य सेवा पुरविण्यावरून राजकारण आणि श्रेयाचा वाद केला. काही ठिकाणी तो विकोपालाही गेला; पण सुदैवाने यावेळी धुळे जिल्ह्यात काही अपवाद वगळता तसे दिसून आले नाही. कोरोनाच्या काळात सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकारी व सर्वच लोकप्रतिनिधींनी आपल्या परीने कोविड रुग्णांना मदत केली आणि करीत आहेत. यात काही अपवाद वगळता कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना दिसून आले नाही, ही विशेष प्रशंसनीय बाब आहे.
तिसऱ्या लाटेची भीती आणि आताची बिकट परिस्थितीत आतापर्यंत सामंजस्य राजकीय मंडळींनी दाखविले. तसेच जिल्हा व पोलीस प्रशासनाने यात समन्वयाची भूमिका घेतल्याने राजकीय वाद झाले नाही.
यात राजकारण आणि श्रेय घेण्याचा वाद नकोच, हीच इच्छा कोरोनाच्या महामारीने होरपळून निघालेल्या धुळेकर नागरिकांचीही आहे.