दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण वाढण्यास साहाय्यभूत ठरत असलेल्या नियमबाह्य वर्तणूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची गरज आहे. स्वॅब टेस्टिंग व अँटिजन टेस्ट प्रमाण वाढविण्यासाठी गरज आहे.
कोरोनाचा पहिल्या लाटेत दोंडाईचात ६ जून, २०२०ला दोन कोरोनाबाधित रुग्णापासून दोंडाईचा शहरात कोरोनाची सुरुवात झाली होती. मधला साधारणतः दोन महिन्यांचा कालावधी सोडला, तर आता पुन्हा कोरोना विषाणूने पुन्हा शिरकाव केला आहे. कोरोनाबाधित वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर नागरिकांनी गंभीर तर प्रशासनाने कठोर होणे गरजेचे आहे. १ मार्च ते १६ मार्च दरम्यान म्हणजे १६ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दाट वस्तीसह कॉलनी भागात उच्चभ्रू वस्तीत कोरोनाने शिरकाव केला आहे. दोडाईचासह परिसरातील निमगुळ, मालपूर, टाकरखेडे या दोंडाईचा नजीक असलेल्या गावात कोरोनाची मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने चिंतेत भर पडली आहे.
१ ते १६ मार्चदरम्यान दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात ४२६ जणांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आलेत. दोडाईचातील काही नागरिकांनी निमगुळ प्राथमिक केंद्रात तर काहींनी खासगीत चाचणी केली आहे.
१ रोजीतीन, ५ रोजी आठ, ८ रोजी एक, ९ रोजी तीन, ११ रोजी १८, १२ रोजी नऊ, १३ रोजी आठ, १४ रोजी दोन, १५ रोजी ३४ तर १६ मार्चला ३४ असे ऐकूण १२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
स्वॅब दिलेल्यात उपजिल्हा रुग्णालयात ७४, निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात २५, दोंडाईचा अँटिजन टेस्टला १५, खासगीत ६ असे १२० कोरोना बाधित रुग्ण आढळलेत.
दोडाईचा व त्या नजीक असलेल्या ग्रामीण भागात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने आता नागरिकांनी सावधानतेने नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. दुकानदारांनी बिनामास्क ग्राहकांना प्रवेश देऊच नये. ग्राहकानेही दुकानदार व त्यांचा नोकरांना मास्क लावण्यास सूचित करावे. कपडे, भांडे व काही किराणा दुकान यातील होणारी गर्दी कमी करावी. पालिका व पोलीस प्रशासनानेही बिनामास्क व सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या विरोधात सरसकट कारवाई करावी. प्रत्येक दुकानात, कार्यालयात सॅनिटायझर बंधनकारक करावे. फक्त कागदोपत्री फतवा न काढता त्याची आता अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य सूज्ञ जनतेचे म्हणणे आहे.
प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्या व सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या विरोधात कारवाई करणे गरजेचे आहे. दुकानात ग्राहकांना प्रवेश देणाऱ्या विरोधात कारवाई अपेक्षित आहे. कोरोनाबाधित रुग्णांना १४ दिवस घरात राहणे बंधनकारक करावे, अशा उपयोजना केल्यात, तर कोरोना अटकाव होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.