धुळे : कोरोना काळात १,५०० रुपयांची मदत करण्याची घोषणा शासनाने केली आहे. परंतु नोंदणीकृत घरेलू कामगारांनी माहिती अपडेट केली नसल्याने ते लाभापासून वंचित आहेत. नोंदणीकृत घरेलू कामगारांनी आपली वैयक्तिक माहिती अपडेट करावी, असे आवाहन सरकारी कामगार विभागाने केले आहे.
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत कामगारांना कोविड – १९ प्रादुर्भाव काळात आर्थिक मदतीच्या दृष्टीने शासनाने प्रत्येकी १,५०० रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे. मात्र, २०११ ते २०१४ या कालावधीत नोंदणी झालेल्या बऱ्याच घरेलू कामगारांनी नोंदणी करताना त्यांच्या बँक खात्याचे पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स व मोबाईल क्रमांक सादर केलेला नाही. या कालावधीतील सर्व नोंदीत घरेलू कामगारांनी त्यांची वैयक्तिक माहिती अद्ययावत करण्यासाठी https://public.mlwb.in/public या लिंकचा वापर करुन आपली वैयक्तिक माहिती, बँक खात्याचा तपशील अद्ययावत करावा. अथवा सरकारी कामगार अधिकारी (दाळवाले बिल्डिंग, जुने जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी अग्रवाल भवनसमोर, धुळे) येथे संपर्क करावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर यांनी केले आहे.