शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील कार्तिक भिल या सात महिन्यांच्या बालकाची तब्येत ठीक नसल्याने, त्याच्या आईने तीन किलोमीटर पायपीट करीत मालपूर येथील डॉ. जयपाल मराठे यांच्या खासगी दवाखान्यात त्याला सोमवारी उपचारासाठी आणले होते. बाळ तसे गुटगुटीत होते. मात्र, या सात महिन्यांच्या बालकाच्या तोंडावर मास्क लावलेला होता. जोपर्यंत ते बालक रुग्णालयात होते, तोपर्यंत त्याने ते मास्क काढले नाही किंवा काढण्याचा प्रयत्नही केला नाही. हे दृश्य पाहून डॉ. जयपाल मराठे हेदेखील अचंबित झाले. अनेक सुशिक्षित नागरिक विनामास्क वावरत असताना या सात महिन्यांच्या बालकाने तोंडावर मास्क लावल्याचे बघून डॅाक्टरही भारावले. त्यांनी केवळ त्या बालकाची तपासणीच केली नाही तर यापुढे वर्षभर त्या बालकाची मोफत तपासणी करण्याचा निर्णय त्यांनी त्याच क्षणी जाहीर केला. कार्तिकचे आई-वडील अशिक्षित असून, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्या बालकाच्या कृतीतून इतरांनीही धडा घेत, कोराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी तोंडाला मास्क लावावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले.
प्रेरणादायी कृती -मराठे
अक्कलकोस येथील कार्तिक भिल या बालकाने तोंडाला मास्क लावल्याचे पाहून मी भारावलो. त्यामुळे त्याची वर्षभर मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेतला. या बालकाला दवाखान्यात आणणे शक्य झाले नाही तर मी स्वत: त्याच्या गावी जाऊन त्याची तपासणी करेन.
डॉ. जयपाल मराठे, मालपूर