धुळे : पीक विमा काढून काही लाभ होत नाही असा समज झाल्याने यंदाच्या खरीपात पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची टक्केवारी कमालीची घसरली आहे. यंदा केवळ ३६ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.
गेल्या वर्षी तब्बल ६९ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता. पंरतु गेल्या वर्षीचा खरीप हंगाम चांगला होता. पिकांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे विम्याचे पैसे मिळाले नाहीत. विमा काढून काहीच उपयोग होत नाही असा समज शेतकऱ्यांनी करुन घेतला. त्यामुळे यंदाच्या खरीपात केवळ ६० टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. ‘कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायाचा का?’, असा खोचक प्रश्न शेतकरी विचारत आहेत. परंतु विम्यामुळे पिकांना सुरक्षा कवच मिळते. पीक विमा काढला पाहिजे.
यंदा केवळ ६० टक्के पीक विमा
गेल्या वर्षी पीक विमा काढून काही लाभ झाला नाही म्हणून यंदा शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. केवळ ६० टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला आहे.
पिकांचे नुकसान झाले आणि निकषात बसले तर विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळते. नुकसान झाले नाही तर पैसे मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना विमा सुरक्षा कवच द्यावे.
गतवर्षीचा अनुभव वाईट
गेल्या वर्षी पीक विमा काढला होता. पंरतु विमा काढून काही उपयोग झाला नाही. विम्याचे भरलेले पैसे वाया गेले. त्यामुळे यंदा विमा काढणे टाळले आहे. काही फायदाच होत नसेल तर विमा का काढावा?
- एक शेतकरी
पाऊस लांबल्याने दुबार पेरणी करावी लागली. दुप्पट खर्च आला. पीक कर्जाचे पैसे वाया गेले. उसनवारीने पैसा उभा केला. आता खरीप हंगामासाठी विमा काढण्यासाठी कुठून पैसे आणू?
- एक शेतकरी
विमा काढल्याने आपल्या पिकांना सुरक्षा कवच मिळते. भविष्यात पिकांचे काही नुकसान झाले तर विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकते. त्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. विमा काढण्यासाठी अजुन दोन दिवसांची मुदत आहे. शेतकऱ्यांनी विमा काढून पिकांना सुरक्षा कवच द्यावे. - विवेक सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी