धुळे - जिल्ह्यत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यासोबतच दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठवडाभराच्या तुलनेत सध्या दुप्पट ऑक्सिजन लागत आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात १० टन इतका ऑक्सिजन लागत आहे. तसेच जिल्हा रुग्णालय व तालुकास्तरावरील रुग्णालयांना एकत्रित १० टन इतका ऑक्सिजन लागत आहे. यापूर्वी पाच ते सहा टन ऑक्सिजन लागत होता. आता मात्र त्यात मोठी वाढ झाली आहे.
हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँकची १३ टन इतकी क्षमता आहे. त्यापैकी ३ टन ऑक्सिजन शिल्लक राहू द्यावा लागतो. उर्वरित १० टन ऑक्सिजन एका दिवसात संपत असून दररोज ऑक्सिजन टँकचे पुनर्भरण करण्यात येत आहे.
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात २६६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी १४६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर ५५ रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत.
तालुकास्तरावर मागणी वाढली - धुळे शहरात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र ग्रामीण भागातील रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शहरातील सर्व रुग्णालयातील बेड फुल झाले असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी तालुकास्तरावरच ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. रुग्णवाढीच्या पहिल्या लाटेत तालुकास्तरावरील कोविड केंद्रांवर ऑक्सिजनची व्यवस्था नव्हती. केवळ सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाच कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात होते. ऑक्सिजनची गरज असलेल्या व गंभीर रुग्णांना हिरे वैद्यकीय महाविद्यालय किंवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत होते. आता मात्र तालुकास्तरावरील कोविड केंद्रात ऑक्सिजनयुक्त बेड तयार करण्यात आले आहेत. मात्र वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे तेथील बेड अपूर्ण पडू लागले आहेत तसेच ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.
शिरपूर तालुक्यात लागतात ५० सिलिंडर -
शिरपूर तालुक्यातील कोविड केअर केंद्रात दररोज ४० ते ५० मोठे ऑक्सिजन सिलिंडर लागत आहेत. यापूर्वी केवळ १० ते १५ ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. मात्र आता रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. एकूण २६० बेडपैकी ७५ बेड ऑक्सिजनयुक्त करण्यात आले आहेत.
शिंदखेड्यात १५० ऑक्सिजनयुक्त बेड -
शिंदखेडा तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये १५० ऑक्सिजनयुक्त बेड आहेत. त्यात, दोंडाईचा व शिंदखेड्याचा समावेश आहे. तसेच ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. सध्या ३५ मोठे ऑक्सिजन सिलिंडर दररोज लागत आहेत. यापूर्वी केवळ १० सिलिंडर लागत होते.
साक्रीत ५० ऑक्सिजन बेड -
साक्री तालुक्यातील कोविड केअर केंद्रात ५० ऑक्सिजन युक्त बेड करण्यात आले आहेत. तसेच एकूण बेडची क्षमता ३३५ बेडपर्यंत वाढवण्यात आली आहे. सध्या दररोज १५ मोठे ऑक्सिजन सिलिंडर लागत आहेत. तालुक्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. उपलब्ध बेड अपूर्ण पडू लागले आहेत. त्यामुळे पिंपळनेर येथे आणखी १०० बेडची तयारी प्रशासनाने केली आहे. येत्या दोन दिवसात १०० बेड्चे कोविड केअर सेंटर सुरु होणार असल्याची माहिती मिळाली.
प्रतिक्रिया -
हिरे वैद्यकीय महाविद्यलयातील ऑक्सिजन टँकची क्षमता १३ टन इतकी आहे. त्यापैकी ३ टन ऑक्सिजन शिल्लक राहू द्यावा लागतो. ते १० टन ऑक्सिजन दररोज लागत आहे. दररोज ऑक्सिजन टँकचे पुनर्भरण केले जाते.
- डॉ.दीपक शेजवळ, कोरोना नोडल अधिकारी
वैद्यकीय महाविद्यालय व्यतिरिक्त उर्वरित जिल्ह्यात दररोज १० टन ऑक्सिजन लागत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ऑक्सिजनची मागणी दुप्पट झाली आहे. धुळे शहरातीलच एका उत्पादकाकडून ऑक्सिजनचा पुरवठा सुरु आहे.
- विजय जाधव, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन