धुळे : येथील देवपूरातील ट्रेडको किसान प्रायव्हेट लिमीटेड कंपनीकडे थकलेल्या महसुलाची वसुली करण्यासाठी महसूल विभागाने जप्तीची कार्यवाही केली. तहसिलदार संजय शिंदे, धुळे शहराचे मंडळ अधिकारी आणि देवपूरचे तलाठी पाटील यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी स्टार्च फॅक्टरीला कुलूप ठोकले. स्टार्च फॅक्टरीकडे शासनाचा ३ लाख १७ हजार २२० रुपये इतका जमीन महसूल बाकी होता. देवपूरचे तलाठी ८ आॅक्टोबर २०२० रोजी वसुलीसाठी गेले होते. परंतु कंपनी बंद असल्याचे निदर्शनाला आल्याने कंपनीच्या प्रवेशद्वारावर नोटीस लावली. त्यानंतर धुळे शहराचे अपर तहसिलदार संजय शिंदे यांनी ११ नाव्हेंबर २०२० रोजी नमुना एकची नोटीस बजावून महसूल अदा करण्याविषयी संधी दिली होती. वसुलीसाठी सक्तीची कार्यवाही करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. तरी देखील संबंधितांनी महसूल भरला नाही. मसहूल देण्यात कसुर केला म्हणून सदर धारण जमीनीचे राज्य शासनाकडे समपहरण करण्यात आले.इतरांनाही दिला इशारामहसूल विभागाने इतरांनाही इशारा दिला आहे. ज्यांच्याकडे जमीन महसूल थकबाकी असेल अशा मिळकतधारकांनी संबंधित तलाठी यांच्याकडे चलनाने महसूलाचा भरणा करावा. अन्यथा मिळकत जप्तीची कार्यवाही केली जाईल, असा इशारा धुळे शहर अपर तहसिलदार संजय शिंदे यांनी दिला आहे.
धुळ्यातील स्टार्च फॅक्टरीवर जप्तीची नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 22:19 IST