कापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची जीर्ण इमारत आज जेसीबी मशिनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. आता येथे ४० लाख रुपये खर्चून नवीन दवाखाना इमारत बांधण्यात येणार आहे.कापडणे येथील पशुवैद्यकीय दवाखाना व कर्मचारी निवासस्थानाची दुरवस्था झाली असून सुमारे तीन वर्षांपासून येथे कायमस्वरूपी डॉक्टरची प्रतीक्षा आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे पशुधन रामभरोसे आहे. याबाबत ‘लोकमत’ने पशुपालकांची व्यथा मांडली होती. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने कापडणे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असलेली मुख्य इमारत ८ जुलै रोजी जेसीबी मशीनच्या सहाय्याने पाडून जमीनदोस्त केली. येथे धुळे जिल्हा नियोजन मंडळ योजनेअंतर्गत ४० लाख रुपये खर्चून सर्व सोयींयुक्त पशुवैद्यकीय दवाखान्याची मुख्य इमारत बांधकामाला लगेच सुरुवात होणार आहे. संपूर्ण बांधकाम करण्यासाठी ९ महिन्याचा कालावधी शासनाकडून मिळालेला आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी-२ अनिल बी. पाटील यांनी सांगितले की, अवघ्या चार ते पाच महिन्यात इमारतीचे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम पूर्ण केले जाईल. कापडणे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम ठेकेदार नकुल सुरेश अहिराव यांनी घेतले आहे.कापडणे येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ येथे जुलै २०१७ पासून कायमस्वरूपी डॉक्टर नसल्यामुळे पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे. येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीसह कर्मचारी निवासस्थानाचेही बांधकाम पूर्ण जीर्ण झाले आहे. पत्रे फुटलेले आहेत, खिडक्यांच्या काच, जाळ्या तुटल्या आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. येथील सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधनावर कायमस्वरूपी उपचार व्हावे, अशी पशुपालकांना अपेक्षा आहे. यासाठी येथील रिक्त पदेही भरण्यात यावी, अशी मागणी आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारत बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे कापडणेसह परिसरातील धमाणे, सायने, देवभाणे, सरवड, धनुर आदी गावातील शेतकरी, पशुपालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जीर्ण पशुवैद्यकीय दवाखाना जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 18:51 IST