धुळे : जिल्ह्यात कोरोनाची लाट तीव्र झाली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, मृतांमध्ये, व्याधीग्रस्त रुग्ण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना मृत्यूच्या दारात ओढण्यात मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार सर्वांत पुढे आहेत. तसेच मृतांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्याधी असलेले रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे व्याधीग्रस्त नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मार्च महिन्यात एकूण ३३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात, व्याधीग्रस्त रुग्णांचेच प्रमाण जास्त आहे. ३३ पैकी २६ रुग्णांना काही ना काही व्याधी होत्या, तर व्याधी नसलेल्या सात रुग्णांचाही मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, तरीही बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. वयोवृद्ध व व्याधीग्रस्त नागरिकांनी बाहेर जाणे टाळणे गरजेचे आहे. अशा नागरिकांनी लस टोचून घेतली नसेल तर तत्काळ लस टोचून घ्यावी. कारण, त्यामुळे सुरक्षितता अधिक वाढते.
दोनपेक्षा जास्त व्याधी असलेल्या दहाजणांचा मृत्यू -
मार्च महिन्यातील मृतांमध्ये दोनपेक्षा जास्त व्याधी असलेल्या दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोणतीही एक व्याधी असलेल्या १४ व तीन प्रकारच्या व्याधी असलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे. एकूण मृतांपैकी एक प्रकारची व्याधी असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक ४२ टक्के आहे. व्याधीग्रस्त रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक आहे. तसेच दुसरी लाट तीव्र झाल्याने कोरोना प्रतिबंधक नियमांचे कठोर पालन करणे गरजेचे आहे.
६१ वर्षांवरील सर्वाधिक १९ मृत्यू -
मार्चमध्ये ३३ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात ६१ पेक्षा जास्त वयाच्या १९ रुग्णांचा समावेश आहे, तर ४० ते ६० या वयोगटातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे -
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये व्याधीग्रस्त नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे अशा अतिजोखमीच्या व्यक्तींनी अधिक काळजी घेतली पाहिजे. मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या व्यक्तींनी घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. तसेच घरीच श्वसनाचे व इतर हलक्या स्वरूपाचे व्यायाम केले पाहिजेत. तसेच तत्काळ लसीकरण करून घ्यावे.
मार्च महिन्यात झालेले एकूण मृत्यू - ३३
इतर आजारांमुळे मृत्यू - २६
केवळ कोरोनामुळे मृत्यू - ७