धुळे : १९४८ मध्ये पहिली बस रस्त्यावर धावली. तेव्हापासून ते २०१९ पर्यंत ७१ वर्षाच्या कालखंडात एस.टी.बसमध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. प्रवाशांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या. एस.टी.त झालेले बदलांचे चित्रप्रदर्शन ‘वारी लालपरी’च्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. हा चित्ररथ शुक्रवारी धुळे आगारात दाखल झाला. एस.टी.चे. बदलेले स्वरूप प्रवाशांंसह नागरिक, विद्यार्थ्यांनाही भावला. एस. टी. मित्र युवकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या 'एस. टी. च्या इतिहासाचा प्रवास एकाच छताखाली तोदेखील एस.टी. बसमध्ये पाहवयास मिळावा, या उद्देशाने अनोखे असे ‘वारी लालपरीचे’ प्रदर्शन भरविण्यात येत आहे. धुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक मोहन एकनाथ तांदळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, किशोर महाजन, आगार प्रमुख भगवान जगनोर यांच्यासह धुळे आगाराचे कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवासी, नागरिक. विविध शाळांचे विद्यार्थी यांच्यासह एस.टी. कर्मचारी व कामगारांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती. महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळ व बस फॉर अस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा ‘वारी लालपरी’ची हा फिरता चित्ररथ संपूर्ण महाराष्टÑाचा दौरा करीत आहे. १९४८ साली पुणे-नगर या मार्गावर पहिली बस धावली. तिथपासून ते शिवशाही बस, माईल्ड स्टील बांधणीची बस, विठाई सेवा आदी एस.टी.चे मॉडेल्स कसे-कसे बदलत गेले याची चित्राच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. याचबरोबर प्रवाशांना महामंडळातर्फे कुठल्या सुविधा दिल्या जातात, राज्यातील १४५ हून अधिक बसस्थानकांचे झालेले नुतनीकरण, त्याचबरोबर आगामी काळात महामंडळ कोणत्या स्वरूपाच्या बसेस सुरू करणार आहे, याचीही माहिती देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून झालेला आहे. या प्रदर्शनाविषयी फाऊंडेशनचे रोहीत धोंडे, सुशांत अवसरे, संयम धारव,रवी मळगे, सुमेध देशभ्रतार यांनी माहिती दिली. शाळांनी दिली प्रदर्शनाला भेटएस.टी.च्या या प्रदर्शनाचा विद्यार्थ्यांनीही लाभ घेतला. शहरातील जवळपास दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन बघितल्याची माहिती रोहित धोंडे यांनी दिली. एसटीवर प्रेम करणाºयांचा समूहबालपणापासूनच एस.टी.वर नितांत प्रेम करणाºया ठाणे, मुंबई येथील तरूणांनी एकत्र येत ‘बस फॉर अस’ फाऊंडेशनची स्थापना केली. एस.टी.चे बदललेले स्वरूप प्रवाशांसमोर यावे या उद्देशाने त्यांनी २६ जानेवारी २०१६ मध्ये पहिल्यांदा ठाण्यात प्रदर्शन भरविले. त्याची दखल एस.टी. महामंडळाने घेतली. महामंडळाने या संस्थेस फक्त बस उपलब्ध करून दिली. बसमधील सर्व बदल, डिझाईन, माहिती ही या तरूणांनीच तयार केलेली आहे. त्यानंतर १ जून २०१९ रोजी एस.टी.चे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांच्याहस्ते मुंबईत या चित्ररथाचे उदघाटन करण्यात आले. तेव्हापासून हा चित्ररथ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात आहे. एसटीबद्दल गैरसमज दूर करण्याचा प्रयत्नएसटी म्हणजे तुटलेले आसन.. खिडकीजवळ मारलेल्या पानांच्या पिचकाºया...आतमध्ये अस्वच्छता.. असा अनेकांचा गैरसमज झालेला आहे. मात्र प्रवाशांचा हा गैरसमज दूर करून, नवीन बांधणीच्या बसमध्ये आराम बससारखीच आसन व्यवस्था आहे, गाडीत स्वच्छताही चांगली आहे, एवढेच नाही तर या बसेसही वातानुकुलीत झाल्या असून, एस.टी.ची स्लीपर सेवा सुरू झाली असल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांचाही एस.टी.कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. जाळपोळीच्या चित्राने लक्ष वेधलेएस.टी. ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. मात्र राज्यात, देशात कुठलीही अप्रिय घटना घडली की निषेध मोर्चांच्यावेळी एस.टी.वरच दगड भिरकवला जातो, जाळपोळ केली जाते. यात एस.टी.चे पर्यायाने प्रवाशांचेच नुकसान होते. या पार्श्वभूमिवर ‘माझी काय चूक होती?’ या शीर्षकाखाली एस.टीच्या जाळपोळीचे छायाचित्र प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. या चित्राने सर्वांचे लक्ष वेधले होते. एस.टी. प्रवाशांच्या सेवेसाठी आहे असा संदेश या चित्रातून दिला.
एस.टी.चे बदलते स्वरूप धुळेकरांना भावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:22 IST