आॅनलाइन लोकमतधुळे : जलयुक्त शिवार या महत्वाकांशी योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढलेली नाही, तर असंख्य गावांचा ताळेबंद तयार झालेला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षातही धुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवारची १ हजार ७०० कामे मंजूर झाली होती. त्यापैकी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तब्बल १ हजार ३७८ कामे पूर्ण झाली असून, ३२२ प्रगतीपथावर आहे. जलयुक्तच्या या झालेल्या कामांमुळे ३ हजार ५२२ टीसीएम पाण्याचा साठा वाढल्याची माहिती जिल्हा कृषी कार्यालयातून देण्यात आली.पावसाचे पाणी शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, विकेंद्रीत जलसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या आणि निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, आणि पाणी अडविण्याच्या कामात लोकसहभाग वाढविणे हा उद्देश घेऊन २०१५ पासून जलयुक्त शिवार ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.२०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्याला १७०० कामांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत १३७८ कामे पूर्ण झालेली आहेत. यात कृषी विभागाची ५६८ व इतर विभागांची ८१० अशा एकूण १३७८ कामांचा समावेश असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. या सर्व कामांसाठी २०७५.३५ लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. आतापर्यंत ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.३२२ कामे प्रगतीपथावरदरम्यान जिल्ह्यात जलयुक्त शिवारची ३२२ कामे प्रगतीपथावर असून, ती लवकरच पूर्ण होतील असे सांगण्यात आले. यावर्षीचा पावसाळा जलयुक्त शिवारासाठी मोठा फायदेशीर ठरलेला आहे. गेल्या दोन वर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे होत होती. मात्र अपेक्षित पाऊस पडत नसल्याने, पाण्याचा पुरेसा साठा होत नव्हता. यावर्षी मात्र उलट स्थिती होती. या वर्षात जुलै ते आॅक्टोंबर अखेरपर्यंत दमदार पाऊस झाला. सर्व नदी-नाले ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या बंधाऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला. या १३७८ कामांमुळे तब्बल ३ हजार ५२२ टीसीएम पाण्याचा साठा झाल्याचे सांगण्यात आले.
धुळे जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची १,३७८ कामे झाली पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:34 IST