धुळे : सातबारा संगणकीकरणात धुळे जिल्ह्याने लक्ष्यवेधी कामगिरी बजावली आहे. धुळे जिल्ह्याने नाशिक विभागातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मार्चअखेर २ लाख ७० हजार ६९५ सातबारा संगणकीरणाचे काम जिल्हाधिकारी संजय यादव, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा ई-फेरफार प्रकल्पाच्या नोडल अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन धुळे जिल्ह्यातील ई-फेरफार प्रणालीमधील प्रलंबित फेरफार यांची प्रलंबितता कमी करून धुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देणारे कामकाज केले आहे. महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पातील सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकाला सुलभ व्हावे म्हणून महाभूमी हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून या संकेतस्थळाच्या आधारे कोणालाही महसूल विभागाच्या सर्व स:शुल्क आणि नि:शुल्क सेवांचा लाभ घेता येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले. आगामी काळातही धुळे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक कायम राखण्यासाठी गुणवत्तापूर्ण कामे विहित कालावधीत पूर्ण केले जातील. महसूल विभागाच्या या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. महसूल विभागाच्या प्रलंबित अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफार यांची प्रलंबितता कमी करण्यासाठी धुळे जिल्ह्यात उल्लेखनीय कामकाज झाले आहे. ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करीत संगणकीकरणाच्या कामकाजाचा नियमितपणे आढावा घेतल्याने ही कामगिरी बजावणे शक्य झाले आहे. - हेमांगी पाटील, नोडल अधिकारी, ई- फेरफार प्रकल्प.
सातबारा संगणकीकरणात धुळे जिल्हा प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 22:52 IST