धुळे : धुळे स्थानकावरुन धुळे - चाळीसगाव रेल्वे पूर्ववत सुरु करावी. तसेच त्याला पुणे आणि दादरचे डबे जोडण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा यांनी मुंबईत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदन देऊन केली.धुळे जिल्ह्यातून शिक्षण , व्यापार आणि वैद्यकीय उपचारासाठी मुंबई , पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे त्यासाठी रेल्वे व्यवस्थापनाकडून धुळे रेल्वे स्थानकावर धुळे- चाळीसगाव रेल्वेला मुंबई , पुण्याचे कोच लावले जातात. अनपेक्षितपणे केंद्रीय रेल्वे व्यवस्थापनाने ही सुविधा बंद केली . त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे . धुळे जिल्ह्यातून मुंबईला रोज सरासरी २५४ , तर पुण्याला रोज सरासरी १५० प्रवासी जातात . आता मुंबई , पुण्याला जाणारी रेल्वे सुविधाच बंद झाल्याने प्रवाशांना चाळीसगावला जावे लागते तरी ही सुविधा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी खासदार सुळे यांनी यासंदर्भात रेल्वे विभागाशी बोलवून रेल्वे सुरु करण्याबाबत चर्चा करते, असे आश्वासन दिले.
धुळे - चाळीसगाव रेल्वे पूर्ववत सुरु करण्यात यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 16:13 IST