धुळे : देवपूर भागात विविध ठिकाणी हरविलेले १९ मोबाईल संबंधितांना योग्य ती खात्री करुन अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले़ या सर्व मोबाईलची किंमत २ लाख ४० हजार रुपये इतकी आहे़ देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते़देवपूर हद्दीत भरणारा बुध बाजार, भाजी बाजार, कॉलेज परिसरासह इतरत्र ठिकाणी मोबाईल हरविण्याचे प्रमाण तसे बऱ्यापैकी आहे़ काहींचे मोबाईल गहाळ होतात़ तर काहींचे मोबाईल चोरी होत असतात़ अशा घटनेनंतर देवपूर पोलीस ठाण्यात संबंधितांकडून मिसींगची नोंद करण्यात आली होती़ त्यानंतर याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते़ २०१९ पासून ते आजपावेतो सुमारे १९ मोबाईल गहाळ झाल्याची नोंद देवपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती़ त्याची किंमत २ लाख ४० हजार रुपये इतकी आहे़याप्रकरणी तांत्रिक माहितीचा आधार घेऊन देवपूर पोलिसांनी गहाळ झालेले मोबाईल आरोपींसह शोधून काढले़ सर्व प्रकारची खात्री आणि प्रशासकीय सोपस्कार केल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते संबंधित १९ जणांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले़ सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, हेड कॉन्स्टेबल डी़ डी़ पाटील, कर्मचारी एस़ पी़ बोडके, व्ही़ एस़ अखडमल, एस़ एस़ सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली़ सदर मोबाईल प्राप्त करुन त्यांचे मुळ मालकाच्या ताब्यात देण्यात आले़
देवपूर पोलिसांनी १९ जणांना परत केले त्यांचे मोबाईल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 19:56 IST