जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै - ऑगस्टमध्येच संपलेली होती. मात्र कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्ह्यातील २१८ पैकी धुळे तालुक्यात ७२, शिंदखेडा तालुक्यात ६३, साक्री तालुक्यात ४९ व शिरपूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा समावेश होता. ७४७ प्रभागांतून १,९८८ सदस्य निवडणून देण्यासाठी तब्बल ६ हजार २०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीनंतर धुळे तालुक्यातील ६, शिंदखेड्यातील १५, साक्रीतील ९ व शिरपूर तालुक्यातील ६ अशा एकूण ३६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, काही वॉर्डांतील एक-दोन जागा असे एकूण ५१२ सदस्य बिनविरोध झालेले आहेत. आता १८२ ग्रामपंचायतींसाठी ३ हजार ३१९ उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या १० दिवसांपासून गल्लोगल्ली प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. उमेदवार व त्यांचे समर्थक गावात फिरून मत मागत होते. गावातील समस्यांवर अनेकांनी प्रकाश टाकला. काहींनी आपल्या वॉर्डात कॉर्नर सभाही घेतल्या. मात्र त्याची संख्या अतिशय कमी प्रमाणात होती.
दरम्यान, शेवटच्या दोन दिवसांत ग्रामीण भागात प्रचारामुळे निवडणुकीची बऱ्यापैकी वातावरण निर्मिती झाल्याचे चित्र दिसून आले. पॅनल प्रमुख व उमेदवारांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांकडून मतांचा जोगवा मागितला.
बुधवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी काही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून प्रचार केला. काही ठिकाणी रॅली काढूनही उमेदवारांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते.
आज मतदान साहित्य वाटप होणार
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, मतदानासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी मतदानाचे साहित्य वाटप केल्यानंतर कर्मचारी त्या-त्या मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत.
नेत्यांच्या सभाही झाल्या नाहीत
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आदी निवडणुकींसाठी नेत्यांच्या प्रमुख गावांमध्ये सभा होत असतात. या सभांमुळे वातावरण निर्मिती होऊन त्याचा फायदा उमेदवाराला होत असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेच बाहेरच्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. काही ठिकाणी तालुका स्तरावरील नेत्यांनीच मोठ्या गावांना भेटी देऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. हे वगळता पॅनल प्रमुख व उमेदवारांनाच प्रचार करावा लागला. यात त्यांना कितपत यश मिळते हे निकालानंतर स्पष्ट होऊ शकणार आहे.