शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडे धरणातून पाणी डाव्या कालव्यातून साेडल्यास देगाव, शेवाडे, आरावे येथील शेतकऱ्यांचे क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. या भागात कांदा लागवड, गहू, हरभरा, मिरची असे विविध प्रकारच्या पिकांची लागवड केलेली आहे. सध्या शेतीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. डाव्या कालव्यातून पाणी साेडल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
वाडी शेवाडे प्रकल्पातील डाव्या कालव्याचे आठ किमी पर्यतचे काम पूर्ण झाले आहे. तसेच उपचाऱ्यांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्या उपचाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात यावे. डाव्या कालव्यातून जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या लहान लहान बंधारे, नाल्यांचे खोलीकरण पाण्याने भरण्यात यावे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल यात पाण्यात विसर्ग होऊन पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते. तरी प्रशासनाने डाव्या कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी जि. प. सदस्य वीरेंद्रसिंग गिरासे यांनी केली आहे.