पंचनामे करण्याची आज शेवटची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 11:43 AM2019-11-08T11:43:19+5:302019-11-08T11:43:38+5:30

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान : जिल्ह्यात ३ लाख ६८ हेक्टर क्षेत्राचे झाले नुकसान, आतापर्यंत ८० टक्के पंचनामे पूर्ण

Deadline for doing punches today | पंचनामे करण्याची आज शेवटची मुदत

पंचनामे करण्याची आज शेवटची मुदत

Next

धुळे :आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनामे करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असून, पंचनामे पूर्ण करण्याची ८ नोव्हेबर शेवटची ‘डेडलाईन’ आहे. आतापर्यंत ८० टक्के क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली आहे. 
जिल्ह्यात यावर्षी जून ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत दमदार पाऊस झाला. त्यामुळे खरिपाची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. सुरवातीच्या कालावधीत पिकांची स्थिती चांगली होती. ज्वारी, मका, बाजरी ही पिके कापणीवर आली होती. 
मात्र आॅक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासूनच सर्वत्र अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. एकही दिवस पावसाविना गेला नाही. त्यामुळे यावर्षी ‘आॅक्टोबर हीट’ची जाणीव झालीच नाही. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा खरीपाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अतिवृष्टीमुळे ज्वारी, बाजरी, मका ही पिके कापून फेकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कपाशीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. 
दरम्यान जिल्हयात आॅक्टोबर २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकाच्या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे. जिलह्यातील ३० महसूल मंडळात ३ लाख ६८ हजार २७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या २ लाख ७० हजार ७७१ एवढी आहे. 
सर्वाधिक नुकसान
 धुळे तालुक्यात 
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान धुळे तालुक्यात झालेले आहे. या तालुक्यात १ लाख २ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या खालोखाल साक्री तालुक्यात नुकसान झालेले आहे. या तालुक्यात ९५ हजार ५८३ हेक्टर, शिंदखेडा तालुक्यात ९२ हजार १८४ हेक्टर तर सर्वात कमी नुकसान शिरपूर तालुक्यात झालेले आहे. या तालुक्यात ७७  हजार ६२५ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. 
नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना शासनातर्फे देण्यात आल्याने, कृषी व महसूल विभागातर्फे संयुक्तपणे १ नोव्हेंबरपासून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करीत आहेत. 
दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्हीसी मध्ये नाशिक विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी ८ नोव्हेंबरपर्यंत नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिलेले आहेत. 
नुकसानग्रस्त भागांची पहाणी
दरम्यान निवडणुक आटोपतचा लोकप्रतिनिधींनीही शेतकºयांच्या शेतात जाऊन नुकसाग्रस्त भागाची पहाणी केलीआहे. जिल्ह्यात पालकमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, यांच्यासह नाशिक विभागाचे विभागीय सचिव एकनाथ डवले यांनीही नुकसानीचा आढावा घेतलेला आहे. तर कॉँग्रेसपक्षातर्फे शेतकºयांना भरपाई मिळावी यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने जास्तीत जास्त मदत करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. 
मंडळनिहाय नुकसान झालेली गावे अशी-
धुळे तालुका-धुळे शहर, धुळे ग्रामीण, कुसुंबा, नेर, शिरूड, बोरकुंड, आर्वी, मुकयी, फागणे, नगाव, सोनगीर, लामकानी. साक्री तालुका- साक्री, कासारे, म्हसदी प्र.नेर, निजामपूर, दुसाणे, ब्राह्मणवेल, दहिवेल, कुडाशी, पिंपळनेर, उमरपाडा. शिंदखेडा तालुका- शिंदखेडा, चिमठाणे, वर्षी, खलाणे, बेटावद, नरडाणा, विरदेल, शेवाडे, विखरण, दोंडाईचा. शिरपूर तालुका- शिरपूर, थाळनेर, बोराडी, सांगवी, होळनांथे, जवखेडा, अर्थे.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पंचनामे पूर्ण करण्याची ८ नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. आतापर्यंत ८० टक्के बाधित क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.
                  विवेक सोनवणे,
जिल्हा कृषी अधीक्षक, धुळे

Web Title: Deadline for doing punches today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे