जिल्हा परिषद सदस्य गोकूळसिंग परदेशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकरी अभिमन शेवाळे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ ११ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी कासारे ग्रामपंचायत सदस्य मनीष देसले, किरण खैरनार, शरीफ पठाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
साक्री तालुक्यातील दिघावे येथील अभिमन रामचंद्र शेवाळे यांच्या शेतातील राहत्या घराला बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरला गॅस गळती झाली. यामुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. यात घरातील धान्य, कपडे, गृहोपयोगी साहित्य, संसारोपयोगी वस्तूंसह भाजीपाला आणि कांदा विकून घर बांधणीसाठी ठेवलेले ३ लाख ४५ हजार रुपये असा ऐवज जळून खाक झाले. घटना लक्षात येताच तातडीने अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी पंचनामा करण्याचे आदेश पारित केल्यामुळे तलाठी रोहित झोडगे यांनी आगीच्या घटनेचा पंचनामा केला. यावेळी सरपंच प्रवीण पाटील, पोलीस पाटील अजय पानपाटील, रत्नाकर पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.