पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येत आहेत. या माध्यमातून उत्पादकतेत वाढ होत आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून ते नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतात. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
यंदाच्या वर्षी खरीप हंगाम २०२१ मध्ये जिल्ह्यातील भात, तूर, उडीद, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), सोयाबीन, सूर्यफुल व भूईमुग या प्रमुख पिकांसाठी पीक स्पर्धा राबविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.
पीक स्पर्धेचे नियम असे
पीक स्पर्धेसाठी तालुका एक आधारभूत घटक धरण्यात येईल, किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण प्रवर्ग गटासाठी दहा, तर आदिवासी प्रवर्ग गटासाठी पाच राहील. पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकरी स्वत: पीक उत्पादक असावेत. पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्ग गट व आदिवासी प्रवर्ग गट दोन्ही गटांसाठी ३०० रुपये शुल्क असेल.