लोकमत न्यूज नेटवर्कनेर : धुळे तालुक्यातील खंडलाय परिसरात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बिबट्याने गायीवर हल्ला चढविला. त्यात गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दहा दिवसात ही तिसरी घटना आहे.खंडलाय बु. ग्रामपंचायत हद्दीतील वरदाडा शिवारात लोटन नानाभाऊ निकम यांचे पूर्वीपासून शेतात घर असून ते परिवारासह तेथे राहतात. रविवारी सकाळच्या सुमारास ते गुरांसाठी गवताची कापणी करीत होते. त्याचवेळी समोरील लिंबाच्या झाडाला बांधलेल्या गायीवर हल्ला करून बिबट्या पसार झाला. डोळ्यासमोर गायीवर हल्ला झाला. परंतू जवळ जाण्याची हिंमत झाली नाही.बिबट्या पसार होताच लोटन निकम यांनी आजुबाजुच्या शेतातील मजुरांना आवाज देत जखमी गायीस वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीवेळातच गायीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती खंडलाय येथील सरपंच उत्तम पगारे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ याबाबत वनविभागास कळविले. नेर परिसरात बोधा वस्ती, जुनेभदाणे, अकलाड, लोणखेडी, खंडलाय या शेत शिवारांमध्ये वारंवार बिबट्या आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाचे कर्मचारी येतात पंचनामा करून रवाना होतात. साधी दखलही घेतली जात नाही. दिवसाढवळ्या बिबट्या फिरत असल्याने घराबाहेर निघणेही कठीण झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.सध्या लग्नसराई सुरु असल्याने नागरिकांची वर्दळ असते. दहा दिवसात ही तिसरी घटना घडली आहे. या अगोदर शिवारातील बोधा वस्तीत गंगाधर सोनवणे, जुनेभदाणे येथील गट नं. १३१ मधील सखाराम नारायण माळी यांच्या शेतात गायीच्या वासरूवर अंधाराचा फायदा घेत बिबट्याने झडप घालत फस्त केले होते.दिवस- रात्र गहु, कांदे, मका, दादर या पिकांना पाणी भरत असतांना शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. वनविभागाने तत्काळ दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. घटनेनंतर वनविभागाच्या कर्मचाºयांना फोनद्वारे कळविण्यात येत. तेही तत्काळ दखल घेत पंचनामा करतात. परंतू नंतर कोणीच दखल घेत नाही. ५ दिवसापुर्वी नेर शिवारातील बोधा वस्तीत व जुने भदाणे येथे बिबट्याने धुमाकुळ घातला होता. त्यानंतर नेरजवळील खंडलाय शिवारात बिबट्याने मोर्चा वळवला आहे. दोन दिवसापूर्वी बिबट्या अकलाडजवळ सुरत-नागपुर महामार्गावर रस्ता ओलांडताना प्रवाशांना दिसला. यामुळे भीतीने पादचारी व दुचाकीस्वार शेतशिवारात पळाले. एक बिबट्या व दोन बछडे फिरतांना दिसून येत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरु आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:06 IST