धुळे- जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना आपल्या मुलासोबत मोटारसायकलवर फिरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीनं स्वत:चं व्हायरल केलेल्या व्हिडीओच्या मदतीनं पोलिसांनी त्याला शोधून काढलं. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं कान धरुन पोलिसांची माफी मागितली. पोलिसांनी या प्रसंगाचं चित्रिकरण करुन तेदेखील त्याला व्हायरल करायला लावलं.संचारबंदी लागू असताना एक व्यक्ती त्याच्या लहान मुलासोबत दुचाकीवरुन फिरत होती. आजूबाजूच्या भागात सगळं काही बंद आहे. पण आम्ही दोघं मस्त फिरतोय. आम्हाला कोण रोखणार, असं म्हणत ही व्यक्ती दुचाकी चालवत होती. याशिवाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रिकरणदेखील करत होती. 'सगळी दुनिया बंद आहे आणि आम्ही बाप बेटे फिरतोय. आमचं साहस बघा. आम्ही केळी आणायला बाहेर पडलो होतो. सध्या आम्ही चाळीसगाव रस्त्यावरुन जात आहोत. इथे रस्त्याच्या बाजूला पोलिसदेखील आहेत. मात्र चिंता करायची नाही. आरामात फिरायचं. इतक्या सुट्ट्या वारंवार कुठे मिळतात', असं ही व्यक्ती दुचाकी चालवता चालवता म्हणत होती. आपलं नाव काल्या दादा असल्याचं तिनं व्हिडीओच्या शेवटी सांगितलं होतं.
VIDEO: संचारबंदीत बाईकवर फिरला, वाट्टेल ते बडबडला; पोलिसांनी शोधला, जबरदस्त इंगा दाखवला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 19:09 IST