गावात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याने व मृत्यूची संख्या वाढल्यामुळे लोकनियुक्त सरपंच विशाल देसले यांनी ग्रामपंचायतस्तरावरून तातडीची बैठक घेतली. त्या बैठकीस तहसीलदार चव्हाणके, गटविकास अधिकारी सूर्यवंशी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यात गाव दोन टप्प्यांत पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाच्या पलीकडे जाऊन आधी कासारे गाव पहिल्या टप्प्यात दि. ८ ते १८ एप्रिलदरम्यान दहा दिवस, नंतर दि. २२ ते ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवले. बंदला सर्व ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी पूर्ण सहकार्य देऊन बंद यशस्वी केला. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व संलग्न सर्व यंत्रणा प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षिका,आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांची बैठक घेऊन गावात सूक्ष्म सर्वेक्षण करण्यासाठी तीस पथके नियुक्ती केली. या पथकांतील सदस्यांनी घरोघरी जाऊन तपासणी केली. गावात फवारणी यंत्राद्वारे दररोज फवारणी करून जनजागृती करण्यात आली. कोविड लसीकरण करण्यासाठी रिक्षाद्वारे जनजागृती केली. अशा अनेक प्रभावी उपाययोजना राबविल्याने कासारे गावातील रुग्णसंख्या कमी झाली. गावात कोरोनाला अटकाव करण्यास ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यशस्वी झाला आहे. सरपंच विशाल देसले यांच्यासह ग्रामविकास अधिकारी अनिल तोरवणे, पोलीसपाटील दीपक काकुस्ते, तलाठी निलेश पाटील यांनी योग्य नियोजन केले. गावकरी व परिसरातील नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त केले जात आहे.
ग्रामपंचायतीच्या नियोजनामुळे कासारे गावात कोरोनाला अटकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST