नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा झाला नसल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागत होते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे लसीची मागणी केली होती.
त्यानुसार १८ ते ४ वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्डचे १५० डोस सोमवारी सायंकाळी प्राप्त झाले. याचा पहिला डोस मंगळवार, गुरुवार, शनिवार असा देण्यात येणार आहे, तर बुधवारपासून ४५ वरील नागरिकांना डोस देण्यात येणार आहे. हे डोस सोमवार, बुधवार, शुक्रवार असे देण्यात येणार आहेत. दुसर्या डोससाठी ५० कोव्हॅक्सिन आणि २०० कोविशिल्ड अशा लसी प्राप्त झाल्या आहेत. २००० पैकी फक्त २५० लसी उपलब्ध आहेत. ज्यांची नोंदणी झालेली आहे, स्लाॅट नंबर आला आहे अशांनाच लस दिली जाईल अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुनील महाले यांनी दिली.
असा उडाला गोंधळ
लस घेण्यासाठी नेरसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु अनेकांचा पहिला आणि दुसरा असा डोस देणे अपेक्षित होते. त्यात नोंदणी होण्यास अडथळे येत होते. तसेच आरोग्य केंद्रातील प्रत्येक कर्मचारी हे नागरिकांना वेगवेगळी माहिती देत होते. त्यामुळे अधिकच गोंधळ उडाला. नागरिकही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे लसीकरणाची सुरुवात होण्याऐवजी बर्याच वेळ गोंधळच सुरू होता. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणाबाबत एकवाक्यता नसल्याने नागरिकांना समजविण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पोलीस बंदोबस्तात लसीकरण करावे
दरम्यान, लसीकरणासाठी नागरिकांकडून अडथळे येत असतील तर पोलीस बंदोबस्त मागवावा आणि पोलीस बंदोबस्त मिळाला नाही तर लसीकरण बंद करावे, असे सक्त आदेश धुळे येथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांनी दिले आहेत.
नोंदणीची पध्दत बदलण्याची मागणी
ॲानलाइन लसीकरण नोंदणीसाठी अडथळे येत आहेत म्हणून ऑफलाइन नोंदणी करून लस द्यावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव बाबुलाल बोरसे यांनी केली आहे.