धुळे तालुक्यातील कापडणे येथील एच. एस. बोरसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कापडणेअंतर्गत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ सेतू अभ्यासक्रम १ जुलै ते १४ ऑगस्ट २०२१पर्यंत सुरू राहणार आहे.
सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण भागातील अनेक पालक व विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाही. काही ठिकाणी रेंजची अडचण आहे. शिक्षण विभागाने ही अडचण लक्षात घेता ४५ दिवसात ब्रीज कोर्स पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविली आहे. त्यामुळे कापडणे येथील बोरसे माध्यमिक विद्यालयाचे सर्वच शिक्षक हे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आर. ए. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कापडणे गावात विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन केवळ १० विद्यार्थ्यांचा गट करून पालकांच्या संमतीने विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबरच ब्रीज कोर्सची माहिती देत आहेत.
एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. यासाठी मुख्याध्यापक आर. ए. पाटील, उपक्रमशील शिक्षक एस. जे. पाटील, डी. व्ही. पाटील, एम. यु. गुळदगड, के. एच. बोरसे आदी शिक्षक प्रयत्नशील आहेत.