राज्यात भंडारा, वसई विरार मुंब्रा येथील रुग्णालयात अग्नी उपद्रव, नाशिक येथे गॅस गळती, आदी दुर्दैवी घटना घडल्या. या घटनांमध्ये प्रामुख्याने फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिटचा अभाव असल्याचे प्रामुख्याने निदर्शनास आले आहे. अशा प्रकारच्या घटना टाळता याव्यात या उद्देशाने जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्वच रुग्णांलयांची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५९ रुग्णालयांची पाहणी करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयात बाधित व्यक्तींवर औषधोपचार व देखभाल करण्यात येते काय, सुरक्षेच्या कोणत्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा, व्हेंटिलेटरची सुविधा, फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे काय? रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा, औषधोपचाराची स्थिती, रुग्णालयात दाखल रुग्णांची वयोगटानुसार संख्या, ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या, उपलब्ध व्हेंटिलेटर आणि प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या, ऑक्सिजनचा मासिक वापर, ऑक्सिजन पुरवठादार कोण, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर किती आहेत, बायोमेडीकल वेस्ट अशा विविध प्रकारच्या ३५ रकान्यांतील पडताळणी या पथकांनी करावयाची आहे.
कोविड रुग्णालयांच्या तपासणीकरिता वर्ग एक दर्जाच्या स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी कोविड रुग्णालयांना भेट देऊन केलेल्या पाहणीचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांना सादर करावयाचा आहे. त्यानुसार आवश्यक त्या उपाययोजना जिल्हाधिकारी स्तरावर करण्यात येणार आहेत. या पथकांनी आता थेट रुग्णालयांना भेट देऊन पडताळणीची प्रक्रिया सुरू केली आहे.
उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार संजय शिंदे, आबा महाजन, सुदाम महाजन, प्रवीण चव्हाणके, गायत्री सैंदाणे, जी. टी. सूर्यवंशी, विनायक थवील, गटविकास अधिकारी एस. टी. सोनवणे, वाय. डी. शिंदे, गौतम सोनवणे, भालचंद्र बैसाणे, गजानन पाटील, कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, विश्वास दराडे, डी. एस. बांगर, प्रकाश खोपकर, प्रकाश बिलोलीकर, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, हेमंत भदाणे, एम. एस. घाडगे, मनीष पवार, किशोर चौरे, महेश भामरे, संजय पढ्यार, मयूर पाटील, आर. ए. पगारे, अमोल बागुल, एस. सी. पवार, प्रवीण निकम या अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.