पवित्र रमजान सण साध्या पध्दतीने साजरा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:38 AM2021-05-11T04:38:24+5:302021-05-11T04:38:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान अर्थात ईद - ऊल- फित्रचा सण साजरा होणार आहे. धुळे ...

Celebrate the holy month of Ramadan in a simple way! | पवित्र रमजान सण साध्या पध्दतीने साजरा करा!

पवित्र रमजान सण साध्या पध्दतीने साजरा करा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान अर्थात ईद - ऊल- फित्रचा सण साजरा होणार आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, रमजानचा सण साध्या पध्दतीने आणि घरगुती वातावरणात साजरा करावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार विकास जमिनी, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

पालकमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे, रमजानचा सण शेवटच्या टप्प्यात आहे. संपूर्ण महिनाभर ठेवलेले रोजे रमजान ईदच्या दिवशी सोडले जातात. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्वजण प्रयत्नशील आहेत. कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. त्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सणही अपवाद नाही. यापूर्वीही मुस्लिम बांधवांनी रमजान ईदसह विविध सण साधेपणाने आणि घरगुती वातावरणात साजरे करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले आहे.

पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सार्वजनिकरित्या नमाज अदा करतात. या कालावधीत नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्य शासनाच्या आदेशानुसार मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह, इफ्तारसाठी मशीद, ईदगाह, सार्वजनिक मोकळ्या ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणासाठी मशीद, इदगाह अथवा अशा मोकळ्या जागी न येता घरीच नमाज पठण करावे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनीसुध्दा महामारी, संसर्गजन्य आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी घरात थांबून दक्षता घ्यावी, अशी शिकवण दिली आहे, असेही पालकमंत्री सत्तार यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत पवित्र रमजान महिन्याचा सण साधेपणाने साजरा करावा. तसेच सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच राहून साजरे करावेत. बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी करू नये. जिल्हा प्रशासनाने साहित्य खरेदीसाठी घालून दिलेल्या वेळेचे बंधन पाळावे. विनाकारण गर्दी करू नये किंवा रस्त्यावर फिरू नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना नागरिकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोना विषाणूची साखळी तोडणे अशक्य आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लिम बांधव सहकार्य करतच आहेत. मात्र, रमजान ईदच्या कालावधीत मुस्लिम बांधवांनी कुठेही गर्दी न करता घरीच प्रार्थना करावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि उन्हाळ्याचे दिवस असल्याने मुस्लिम बांधवांनी रमजान सणानिमित्त पर्यटनस्थळी जाणेसुध्दा टाळावे. रमजानचा पवित्र महिना हा उपवास पर्वाच्या समाप्तीचा दिवस आहे. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे मानवतावादी संदेशाचे स्मरण करून देणारा हा दिवस आहे, अशा शब्दात त्यांनी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Celebrate the holy month of Ramadan in a simple way!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.