धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात घरफोडी झाली असून मोटारसायकलसह ४४ हजार रुपयांचा एेजव चोरट्याने लंपास केला आहे.
गेल्या आठवड्यात मंगळवारी सकाळी १० ते शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. दोंडाईचात चुडाणे रोडवरील रहिवासी नामदेव हरी वाडीले (५८) हे बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने लोखंडी गेटचे कुलूप तोडून कंपाऊंडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लाेखंडी तसेच लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरुममधील कपाट फोडून कॅमेरा बॅग तसेच रोख रक्कम चोरुन नेली. जाताना चोरट्याने कंपाऊंडमधील मोटारसायकल देखील चोरुन नेली. नामदेव वाडिले घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन वाडिले यांची फिर्याद लिहून घेतली. त्यानुसार रविवारी दुपारी दोंडाईचा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड काॅन्स्टेबल मराठे करीत आहेत.