ॲक्टिव्ह रुग्णांची वाढलेली संख्या, कोलमडलेले बेड मॅनेजमेंट, ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण व रिक्त पदांमुळे आलेला अतिरिक्त ताण यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. तसेच आरोग्य यंत्रणेतील प्रमुख अधिकाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने कमी मनुष्यबळाच्या आधारे आरोग्य यंत्रणा कोरोना विरुद्धचे युद्ध लढते आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र आहे. दररोज ५०० पेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येने ४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाने केलेले बेड मॅनेजमेंट कोलमडले आहे. शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालये देखील फुल्ल झाली आहेत. रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होणे ही तर लांबचीच गोष्ट. बेड न मिळण्याने अनेक रुग्णांना गरज असतानाही गृह विलगीकरणात राहावे लागत आहे. बेडसाठी अक्षरशः वेटिंग आहे. एखादा बेड उपलब्ध झाल्यानंतर रुग्णाला संपर्क करून बोलावून घेतले जाते आहे. पहिल्या लाटेला यशस्वीपणे तोंड देणारी यंत्रणा मात्र दुसऱ्या लाटेत पुरती हतबल झालेली दिसून येत आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती नियंत्रणात राहिली होती. रुग्णांना वेळेवर बेड, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मिळत होते. तसेच कोरोनामुक्त रुग्णांमध्ये जिल्हा सातत्याने आघाडीवर राहिला होता. तसेच पुरेसे बेड व ऑक्सिजन उपलब्ध होते. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात होते. मात्र, सध्या वाढलेली पॉझिटिव्हिटी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच कोरोनाची लक्षणेही काही प्रमाणात बदलली आहेत. सुरुवातीचे काही दिवस सौम्य लक्षणे असतात व नंतर तीन ते चार दिवसांतच लक्षणे अधिक तीव्र होतात. त्यामुळे रुग्णांना ऐनवेळेस ऑक्सिजन मिळण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर बेड वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच नागरिकांनीदेखील कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे गरजेचे आहे.