धुळे - महारेराने प्रसिद्ध केलेल्या बाधित प्रकल्पासंदर्भात काय करता येऊ शकते, यासंदर्भात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी हे धुळ्यातील बिल्डर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.
नुकतीच महारेराने राज्यामधील रेराकडे नोंदणीकृत असणाऱ्या काही सदनिका गृहप्रकल्पांची यादी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. काही माध्यमांनी कमी-अधिक प्रमाणात वर नमूद गृहबांधणी प्रकल्प काळ्या यादीत टाकले यासदृश नकारात्मक बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. वस्तुनिष्ठ परिस्थिती जरा वेगळी आहे, जसे की सदर यादी प्रकल्प विकासकांनी जाहीर केलेल्या मुदतीत पूर्णत्वाकडे चालले असताना त्यामध्ये काही संबंधित; परंतु तांत्रिक स्वरूपाची कागदपत्रे विहित नमुन्यात वा मुदतीत महारेराकडे जमा करण्याची पूर्तता न केल्यामुळे संबंधित प्रकल्पांची यादी महारेराने मुदतीत पूर्ण न झालेले प्रकल्प म्हणून जाहीर केलेली आहे. तांत्रिक स्वरूपाची कागदपत्रे महारेराकडे संकेतस्थळावर अपलोड केली नाहीत म्हणून त्या प्रकल्पांचा समावेश या यादीत केलेला आहे. यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने मदतकक्ष स्थापन केला आहे. सदर यादीतील प्रकल्पांची सर्व संबंधितांनी शहानिशा करावी, असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया राज्याचे चेअरमन रणधीर भोईटे यांनी केले आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची ‘महारेरा व रियल इस्टेट’संबंधित राज्यस्तरीय समिती स्वप्नील कौलगुड, सांगली यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेली असून, यामध्ये संजय संघवी (बारामती) व मोहिंदर रिजवाणी (मुंबई) यांचा समावेश आहे, तसेच विद्या भागवत यांची तांत्रिक सल्लागार म्हणून समितीवर नेमणूक केली आहे. ज्यांचे प्रकल्प सदर यादीमध्ये फक्त तांत्रिक कारणामुळे समाविष्ट झालेले आहेत, त्यांना या समितीमार्फत मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच विविध विषयांवर बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने रणधीर भोईटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महारेरा चेअरमन अजोय मेहता यांची भेट घेतली असून, व्यावसायिकांच्या व ग्राहकांच्या बाबतीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. महारेराकडून येणाऱ्या विविध परिपत्रकांवरसुद्धा चर्चा झाली, तसेच कोरोना महामारीमुळे सर्वच गृहप्रकल्पांना पूर्ण होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सर्वच कार्यान्वित प्रकल्पांना आपोआपच एक वर्षाची मुदतवाढ मिळावी अशी आग्रही मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करीत असल्याचे दाखवून दिले. यावर अजोय मेहता यांनी योग्य निर्णय घेऊन सहा महिने मुदतवाढ देण्यात येईल असे आश्वासन दिले. राज्यातील बांधकाम व्यावसायिकांसाठी व ग्राहकांसाठी महारेरा चेअरमन अजोय मेहता व त्यांचे सहकारी हे बुधवारी दुपारी ४ वाजता व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संबोधित करणार आहेत. याची लिंक बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याकडे उपलब्ध आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया धुळे सेंटरचे अध्यक्ष कुणाल कृष्णकुमार सोनार, सेक्रेटरी दीपक अहिरे, राजेश वाणी, भारत वाघ, संजय देसले, सुनील मुंदडा, संजय पाटील, शीतल नवले, शांताराम पाटील, अक्षय मुंडके यांनी केले आहे.