धुळे : देवपुरातील विद्यानगरात चोरट्यांनी बंद घराचा फायदा उचलत धाडसी घरफोडी केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली़ ही बाब सकाळी लक्षात आली़ चोरट्यांनी दागिन्यांसह रोकड लांबविली आहे़विद्यानगरी प्लॉट नंबर १५८ मध्ये राहणारे अशोक भिला थोरात यांच्या घरी ही धाडसी चोरी झाली़ त्यांचे घर बंद होते, त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला़ चोरटे खिडकीद्वारे घरात शिरले आणि त्यांनी हातसफाई केली़ या घरफोडीत साडेचार तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र, पोत ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पँडल, चार ग्रॅम वजनाची सोन्याची एक अंगठी, तसेच कपाटात ठेवलेल्या कपाड्यांमध्ये ठेवलेले १९ ते २० हजार रुपयांची रोकड, मुलगा सौरभ याच्या पाकिटात असलेले साडेपाच हजार रुपये आणि माझ्या पँटच्या खिशात ठेवलेले १ हजार ९०० रुपये असा एकूण दोन ते अडीच लाखांचा ऐवज चोरट्याने शिताफिने लांबविला आहे़चोरीची ही घटना सकाळी उजेडात आल्यानंतर चोरट्यांचा शोधाशोध सुरु झाला़ पण, त्याचा काही उपयोग झाला नाही़ याप्रकरणी अशोक थोरात यांनी देवपूर पोलीस ठाणे गाठले आणि चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली़ त्यानुसार देवपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत़
विद्यानगरीत धाडसी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 22:01 IST