धुळे : धुळ्यानजिक लळींग धबधब्यात तीन तरुण बुडाल्याची दुर्देवी घटना सोमवारी दुपारी घडली होती़ दोन तरुण सापडल्यानंतर एका तरुणाचा शोध लागत नव्हता़ मंगळवारी सकाळी शोध सुरु केल्यानंतर शुभम चव्हाण या तरुणाचा शोध लागला़मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्यानजिक लळींग येथील लांडोर बंगला परिसरात धबधबा आहे़ या भागात सोमवारी ७ ते ८ मित्र एकत्र आले आणि त्यांनी लळींग धबधबा गाठत पोहण्याचा आनंद घेतला़ पाण्यात पोहत असताना त्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे एका पाठोपाठ तिघे बुडाले़ त्यात देवपुरातील जीटीपी स्टॉप परिसरातील अंबाजी नगरात राहणारा रोहित कोमलसिंग गिरासे (२०), अमळनेर तालुक्यातील पडासदळे येथील शुभम प्रेमराज पाटील (२०) आणि शुभम अनिल चव्हाण (रा़ अभियंता नगर, धुळे) या तरुणांचा समावेश होता़ पोलिसांनी आणि आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी धाव घेतली़ सोमवारी सायंकाळपर्यंत रोहित गिरासे आणि रोहित पाटील यांचा मृतदेह शोधून काढला़ तर मंगळवारी सकाळी शुभम चव्हाण याचा मृतदेह सापडला़ त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषीत केले़
लळींग धबधब्यात तिसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:18 IST