लग्नकार्यांना उमेदवारांची आवर्जून हजेरी
मत मिळविण्यासाठी.. मतदारांना भेटण्यासाठी कोण काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक जण आपले भाग्य आजमावित आहेत. मात्र वलयांकित उमेदवार सोडले तर अनेकांना आपल्या प्रचारावर भर द्यावा लागत आहे. त्यातच आता लग्नसराई सुरू झाल्याने लग्नांना वॉर्डातील अनेक जण उपस्थित असतात. हे लक्षात घेऊन, मतदारांना भेटण्यासाठी, उमेदवार वॉर्डातील लग्नांना आवर्जून हजेरी लावत आहेत. हजेरी लावत असताना ‘माझ्याकडे लक्ष असू द्या’ हे सांगण्यास ते विसरत नाहीत. त्यामुळे हा उमेदवार लग्नाला आला होता की मत मागायला, असा प्रश्न तेथील उपस्थित करू लागले आहेत.
मेजवानी देणाऱ्यांचे होतेय गुणगान
ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचारालाही वेग येत आहे. वॉर्डात फिरत असताना मागे कार्यकर्त्यांची फौज दिसली पाहिजे, यासाठी उमेदवारांकडून कार्यकर्त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून खूश ठेवले जात आहे. गरज असल्याने, उमेदवारही सढळ हाताने पैसा खर्च करताना दिसून येत आहे. यातच उमेदवार श्रीमंत असला तर कार्यकर्त्यांची चंगळच असते. उमेदवारांकडूनच ‘व्यवस्था’ होत असल्याने, काही कार्यकर्त्यांना रात्रीच्या घरच्या जेवणाचा विसरच पडलेला दिसून येत आहे. उमेदवाराकडून ‘यथेच्छ’ मेजवानी मिळत असल्याने, कार्यकर्तेही उमेदवारांचे गुणगान करताना दिसून येत आहेत.