भाजपातील नाराजांचा गट, कथित फुटीच्या वल्गना... या अनुषंगाने अनुप अग्रवाल यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत हेडमास्तरची भूमिका यशस्वीपणे निभावली. निवडणुकीच्या २४ तास आधी म्हणजेच गुरुवारी अनुप अग्रवाल यांनी दमण गाठले. सर्व नगरसेवकांशी चर्चा केली. त्या चर्चेतून कोणीही नाराज नसल्याची खात्री त्यांना पटली. त्यामुळे नाराज असल्याच्या केवळ हवेतल्या गप्पा निघाल्याचे समोर आले. त्यांनी सर्व नगरसेवकांना एकसंध ठेवले. त्यामुळे भाजपच्या सर्वच्या सर्व ५० नगरसेवकांनी भाजप उमेदवार प्रदीप कर्पे यांना मतदान करून महापौरपदी विराजमान केले. अनुप अग्रवाल यांच्यासोबत माजी मंत्री जयकुमार रावल हे देखील सहभागी आहेत. महापौरपदी प्रदीप कर्पे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होताच मुक्कामी असलेल्या रिसॉर्टमध्ये भाजपा नगरसेवकांनी विजयोत्सव साजरा केला. पेढे भरवून सेलिब्रेशन केले.
विजयाची घोषणा केल्यानंतर महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी सांगितले की, महापालिकेत झालेला विजय हा ऐतिहासिक आहे. महापालिकेत भाजपाचा महापौर बसला आहे. ५० नगरसेवक जिंकून आल्याने एकजुटीचा विजय आहे. या तुलनेत महाविकास आघाडीच्या सर्व घटकांत एकसूत्रता नव्हती. एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार उभा केल्याने हे दिसून आले.