महापालिकेच्या आवारात सुवर्णकार समाजाचे संतश्रेष्ठ नरहरी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकापर्ण सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, नगराध्यक्ष भूपेश पटेल, महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आयुक्त अजिज शेख, नंदकुमार वडनेरे, माजी महापौर कल्पना महाले, जयश्री अहिरराव, उपमहापौर , स्थायी समिती सभापती संजय जाधव, सभागृह नेते राजेश पवार, विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, महिला व बालकल्याण सभापती वंदना थोरात उपस्थित होते.
या कार्यक्रमात खासदार डॉ.भामरे आणि आमदार महाजन हे व्यासपीठावर जवळ - जवळ बसले होते. कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये चर्चा सुरु होती. कार्यक्रमात आधी खासदार डॉ.सुभाष भामरे हे बोलण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी आता आपली चर्चा सुरु असतांना त्यांनी माझ्या कानात आताच सांगितले की, सहा महिन्यात राज्यात भाजपाची सत्ता बसणार आहे आणि मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस होतील. त्यामुळे देवपूर येथील रस्त्यासाठी राज्य शासनाकडून ३०० कोटींचा निधी मिळवून देणार आहेत. त्यामुळे आगामी काळात धुळेकरांचे प्रश्न सुटणार आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर त्याठिकाणी उपस्थित भाजपाच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.
मात्र त्यांचे भाषण संपल्यावर बोलण्यास उभे राहिलेले आमदार गिरीश महाजन म्हणाले की, बाबांच्या ऐकण्यात गडबड झाली राज्यात सहा महिन्यात सत्ता येईल असे म्हणालोच नाही. दोंडाईचा येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भारती पवार आले आहेत. त्याचे मला दोन वेळा फोन येऊन गेला की, कार्यक्रमात नेते कोणीही उपस्थित नाही. त्यामुळे मला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे गरजेचे आहे. मात्र सुवर्णकार समाजाचा कार्यक्रम सोडून जाणे योग्य नाही. त्यामुळे मी डाॅ. भामरे सांगितले की, थोडा वेळ थांबू, मात्र त्यांनी वेगळेच ऐकले, त्यांच्या ऐकण्यात गडबड झाली. राज्यात सहा महिन्यात भाजपाची सत्ता येईल असे की बोललोच नाही. मात्र तुमचा शब्द खरा ठरो आणि सहा महिन्यात भाजपाची सत्ता येवो,असे महाजन यांनी सांगितले. दरम्यान माजी मंत्री भामरे व महाजन यांच्या विधानामुळे कार्यक्रमात तर्कवितर्क काढले जात होते.