शेजारील जळगाव जिल्ह्याप्रमाणे याठिकाणीही महाविकास आघाडी उलटफेर करु शकेल, असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची हवाच महापौर निवडीनंतर निघून गेली. उलट निकालानंतर एक स्पष्ट झाले की, महाविकास आघाडीत शेवटपर्यंत एकसूत्रता किंवा एकजूट नव्हती. महाविकास आघाडीत महापौर निवडणुकीसाठी सुरुवातीपासून राजकीय हालचालीत राष्ट्रवादी अग्रसेर होती. राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी यात आघाडी घेतली होती. भाजपाच्या महापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांच्या एका गटाशी ते गेले काही दिवस नव्हे तर महिन्यापासून संपर्कात होते. त्यांच्या या नगरसेवकांसोबत बैठकाही झाल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची एकत्रित बैठक घेतली. पण नंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याची जशी वेळ जवळ येत गेली तशी राष्ट्रवादीही मागे पडत गेली. यासाठी राष्ट्रवादीतीलच एक गट हा या सर्व राजकीय हालचालीमुळे नाखुश होता. तो गट यात रस दाखवित नसल्याने शेवटी या सर्व राजकीय हालचालीतून राष्ट्रवादी मागे पडली. महाविकास आघाडीतील अन्य सर्व पक्षातीलही काही नेते या सर्वांपासून वेगळे राहत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरुवातीला वेगाने घडणाऱ्या राजकीय हालचालींना ब्रेक लागला. उमेदवारी अर्ज दाखल करतानाही महाविकास आघाडीत एकमत दिसून आले नाही. कारण शिवसेना आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले.
मतदानाच्या वेळीसुद्धा काँग्रेस - राष्ट्रवादी एक दिसून आले; मात्र शिवसेना वेगळी पडल्याचे दिसून आले. माघारीच्या वेळेस शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली. पण मतदान करताना महाविकास आघाडीच्या सोबत न जाता तटस्थाची भूमिका घेतली. महापौर निवडणुकीत एकही पक्षाचे मत फुटले नाही. त्यावरुनच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे राजकीय गणित चुकले आणि त्यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत फक्त विरोधाला विरोध म्हणून आपला उमेदवार उभा करुन निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही.
पण निवडणुकीच्या निकालानंतर हेही स्पष्ट झाले की, महाविकास आघाडीच्या सर्व पक्षातील काही नेतेमंडळींनासुद्धा असाच निकाल पाहिजे होता. म्हणून त्यांनी फक्त बघ्याची भूमिका पार पाडत एकप्रकारे भाजपालाच सपोर्ट केला, हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.