धुळे : रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या अशा विकृत कार्यक्रमांची माहिती पोलिसांना वेळेववर मिळत नसल्याने कारवाईपासून सुटका होते. परंतु रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांना पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
महाविद्यालयीन तरुण आणि गुंड प्रवृत्तीच्या टोळ्यांमध्ये रस्त्यावर वाढिदवस साजरा करण्याची क्रेझ सर्वाधिक आहे. डीजे लावून रस्त्यावर केक कापला जातो. गाण्यांवर नाचताना गोंधळ घातला जातो. काही महाभागा तर तलावरीने केक कापण्यापर्यंतची मजल मारतात. हा सर्व प्रकार केवळ चमकोगिरी करण्यासाठी केला जातो. मुळात वाढदिवस हा खासगी कार्यक्रम असतो आणि तो घरात किंवा भवनात साजरा करावयाचा असतो. परंतु रस्त्यावर वाढदिवस साजरा करून, बॅनरबाजी करून नियमांचे उल्लंघन केले जाते.
देवपूरात अशाच एका व्यक्तीचा रस्त्यावरचा वाढदिवसाचा कार्यक्रम पोलिसांनी उधळून लावला होता. वाढदिवसाचे बॅनर फाडून गुन्हादेखील दाखल केला होता. या कारवाईमुळे शहरासह जिल्ह्यात काही अंशी वचक निर्माण झाला आहे.
गुन्हेगारी पटकथेवर आधारित चित्रपटांचे अनुकरण तरुणवर्ग करू लागला आहे. चित्रपटांप्रमाणेच धुळे शहरातही कारागृहातून जामिनावर सुटलेल्या संशयितांच्या डीजे लावून मिरवणुका देखील निघाल्या आहेत. अशाच एका मिरवणुकीवर पोलिसांनी कारवाई केली होती.
शहरासह ग्रामीण भागात रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
...तर गुन्हा दाखल
रस्त्यावर वाहने उभी करुन केक कापणे.
तलवारीच्या साहायाने केक कापणे.
डीजे-गाणी लावून रस्त्यावर गोंधळ घालणे.
मध्यरात्री फटाके फोडणे.
सार्वजनिक शांततेचा भंग करणे.
रहदारीला अडथळा निर्माण करणे.
रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सार्वजिनक ठिकाणी असभ्य, त्रासदायक वर्तन केल्याप्रकरणी कारवाई होवू शकते. असले प्रकार खपवून घेणार नाहीत.
- शिवाजी बुधवंत, पीआय, एलसीबी