याबाबत महानगरपालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेत सफाई कर्मचारी हे कोणत्याही सुरक्षित साधनसामग्रीविना स्वच्छतेचे काम करून शहर स्वच्छ, सुंदर, आरोग्यमय ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करीत असतात. या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन उशिरा होते. आपल्या काैटुंबिक गरजा भागविण्यासाठी, तसेच सोयी सुविधांसाठी बँकांचे कर्ज घेतले असते. वेतन वेळेवर न झाल्याने हप्ते थकतात आणि बँकांचे व्याज वाढते. बँकेच्या हप्त्यांसाठी इतरांकडून उसनवार पैसे घ्यावे लागतात. यामुळे सफाई कर्मचारी हे दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहेत. यामुळे त्यांचे मानसिक व आर्थिक शोषण होत आहे. अगोदरच पुरेशा व सुरक्षित साधनसामग्रीविना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांची प्रकृती जास्त बिघडत असते. सफाई कर्मचारी आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे कार्य करीत असतील तर त्यांना त्यांच्या हक्काचे वेतन वेळेवर देणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे.
महानगरपालिकेच्या आस्थापना कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारीमुळे जवळजवळ १०० पेक्षा अधिक सफाई कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन दुसऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने कर्मचाऱ्यांना अद्यापही ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळालेले नाही. दोन दिवसांच्या आत वेतन मिळावे आणि पुढील महिन्यांपासून सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन हे पाच तारखेच्या आत अदा करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भालचंद्र सोनगत, तालुकाध्यक्ष मोहन शिंदे, युवा आघाडी अध्यक्ष रोहित चांगरे, प्रशांत वाघ, किरण बोरसे, विकी पाटील, विश्राम पाटील, पप्पू बागुल, आदी पदाधिकाऱ्यांसह विक्रम लोट, शंकर लोंढे, शफिक शेख, जावेद शेख, कुणाल सहिते, लखन लोंढे, संतोष वाघ, गणेश पानसे, आदी सफाई कर्मचाऱ्यांनी दिला आहे.