धुळे : मुलबाळ होत नाही आणि दुसरे लग्न करण्यास विरोध केल्याप्रकरणी विवाहितेला मारहाण करीत तिला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला़ ही घटना धुळे तालुक्यातील रावेर गावात शनिवारी घडली़ याप्रकरणी पतीसह तिघांविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ यात दोघांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ममता गणेश जाधव या विवाहितेच्या लग्नाला आठ वर्ष झाले तरी मुलबाळ झाले नाही. परिणामी पतीच्या दुसऱ्या लग्न करण्यास तिचा विरोध होता. तसेच पतीकडून दुसरे लग्न करण्यासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली जात होती़ यावरुन त्यांच्यात नेहमी वाद होत होते. त्यातून विवाहितेला शिवीगाळ आणि मारहाण देखील केली जात होती़ शनिवारी सकाळी पुन्हा पती-पत्नीत वाद सुरु झाला़ यातून घरातील मुंग्या मारण्याचे औषध विवाहितेला पाजत तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला़ विष पोटात गेल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले़ तातडीने तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत़प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ममता गणेश जाधव हिने धुळे तालुका पोलीस ठाणे गाठत रविवारी पहाटे फिर्याद दाखल केली़ त्यानुसार पती गणेश रायसिंग जाधव, सासरा रायसिंग श्रीपत जाधव आणि सासू वत्सला जाधव (सर्व रा़ मुक्ताईदेवी मंदिराजवळ, रावेर ता़ धुळे) या संशयितांविरोधात भादंवि कलम ३०७, ४९८ (अ), ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश रायसिंग जाधव, रायसिंग श्रीपत जाधव यांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ तपास सहायक पोलीस निरीक्षक आऱ एस़ काळे करीत आहेत़
विवाहितेला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 20:58 IST