ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पना पिंपळे व त्यांच्या अंगरक्षक यांच्यावर अनधिकृत हातगाडीधारकांवर मनपाच्यावतीने कारवाई करताना अचानकपणे एका माथेफिरू हातगाडीधारक अमरजीत यादव याने त्यांच्यावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करून गुन्हेगारी कृत्य करत सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या हाताची व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यादेखील हाताची बोटे छाटली. सुदैवाने घटनास्थळी वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे त्यांची जीवितहानी टाळता आली आहे. ही घटना ३० ऑगस्ट रोजी घडली असून अद्यापही त्यांची प्रकृती गंभीर आहे.
अशा प्रकार शासकीय कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले व विशेषत: महिला अधिकाऱ्यांवर झालेला हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध व्यक्त करते व दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात अशाप्रकारचे हल्ले होणार नाहीत याबाबत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये दहशत निर्माण होईल तसेच अनधिकृत हातगाडीधारक, फेरीवाले यांच्यावर प्रत्येक महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात कठोर कारवाई करण्यात यावी. नोंदणीकृत हातगाडीधारक व फेरीवाले यांनाच परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़
मनसे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम, जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष संध्या पाटील, शहराध्यक्ष अमिषा गावडे-पाटील यांच्यासह चारुशीला खैरनार, नीशा पाटील, केतकी पाटील, कमल पाटील, अंकिता राहुळ, रुचिता पाटील, चारूशीला पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होत्या़