एटीएम मशिनच उचलून नेले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:34 PM2020-03-01T12:34:41+5:302020-03-01T12:38:41+5:30

राजेंद्र शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्क धुळे तालुक्यातील शिरुड गावात मुख्य चौकातील सेंट्रल बँकेचे १४ लाख ७ हजार ५०० ...

 ATM machine lifted. | एटीएम मशिनच उचलून नेले.

dhule

Next

राजेंद्र शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे तालुक्यातील शिरुड गावात मुख्य चौकातील सेंट्रल बँकेचे १४ लाख ७ हजार ५०० रुपयांची रोकड असलेले एटीएम मशिनच चोरटयाने पळवून नेल्याची घटना शनिवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली़ हेच मशिन याआधी आॅक्टोबर २०१९ मध्ये अशाचपद्धतीने पळवून नेण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्यावेळी ग्रामस्थांच्या जागरुकतेमुळे त्यात चोरटयांना यश आले नव्हते. यावेळी मात्र चोरटे रोकडसह एटीएम मशिन पळवून नेण्यात यशस्वी ठरले. अर्थात, हे तेच चोरटे होते, हे ठामपणे सांगता येऊ शकत नाही. पण चोरीची पद्धत तिच असल्याने हे तेच असावे, असा अंदाज आहे. पाच महिन्यापूर्वीच्या अयशस्वी प्रयत्नानंतर अशी घटना परत होऊ नये, यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्यात पोलिसांसोबतच बँकेचे व्यवस्थापनही अपयशी ठरले आहे. दोन्ही विभागाने चोरटयांना फारच हलक्यात घेतले असेच म्हणावे लागेल. शुक्रवारी मशिनमध्ये पैसे टाकल्यानंतर त्या संधीचा फायदा चोरटयांनी उचलला. यावरुन चोरटे हे पहिल्यांदा आलेल्या अपयशानंतर सुद्धा या एटीएमवर पाळत ठेऊन होते. म्हणजेच ते या परिसराशी आणि बँकेतील घडामोडीचे जाणकार होते, हे स्पष्ट होते.
याआधीही धुळ्यात काही वर्षापूर्वी देवपुरातील मोठ्या पुलाजवळील एटीएम फोडले होते. त्यावेळी तेथील सिक्युरीटी गार्डचा खूनही झाला होता. त्यानंतर रामवाडीजवळील एटीएम मशीन अशाच पद्धतीने गाडीच्या मदतीने ओढून उचलून नेल्याची घटना घडली होती. नंतर ते एटीएम मशिन मालेगावजवळ फोडलेल्या अवस्थेत आढळून आले होते. या घटनांचा तपास अद्याप पोलिसांना लागू शकलेला नाही. त्यात आता या घटनेची भर पडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा धुळे चर्चेत आले आहे.
तसेही गेल्या दोन वर्षात भल्या पहाटे झालेला गुंड गुड्डयाच्या खून, देवपुरातील कॉलनी परिसरात झालेला रावसाहेब पाटील पिता- पुत्राचा खून, देवपुरातील बिअरबारजवळील प्रशांत साळवे खून प्रकरण, नगाव येथील श्याम बिल्डींग मॉल बाहेरील वॉचमनचा खून या क्राईमच्या घटनांनी धुळे शहराचे नाव आधीच सोशल मिडियावरुन संपूर्ण देशातच नव्हेतर जगभरात पोहचले आहे.
याशिवाय धुळयातील सातपुडाच्या कुशीत ठिकठिकाणी बनावट दारु तयार करण्याचे मिनी कारखाने चालतात, हे वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या कारवाईने स्पष्ट होते. आता बनावट दारुचे मिनी कारखाने शिरपूर आणि धुळे शहरातही सुरु असल्याचे पोलीस कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम भागात महाराष्टÑ आणि मध्यप्रदेशमधील काही ठराविक गावांमध्ये सर्रासपणे गावठी पिस्तुल तयार करण्याचा व्यवसाय चालतो. या गावांमध्ये पाच हजार रुपयातही पिस्तुल उपलब्ध होते. धुळ्यातील बनावट पिस्तुल ही राज्यभरात पोहचली आहे. पुणे पोलिसांनी काही महिन्यापूर्वी तेथील तरुणांकडून देशी कट्टे पकडले होते. ते धुळ्यातूनच आणल्याचे उघड झाले होते. याशिवाय महामार्गावरुन जाणाऱ्या टँकरमधील केमिकलची हेराफेरी आणि बनावट डांबरचा धंदा अशाप्रकारचे अवैध धंदे जिल्ह्यात सर्रासपणे चालतात. हे पोलीस विभागाकडून वारंवार होणाºया कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पण पोलिसांच्या कारवाई नंतर हे धंदे बंद होण्याऐवजी आणखी वाढले आहे. कारण हे धंदे करणाऱ्यांवर राजकीय वरदहस्त आहे. हे धंदे करणारेच काही राजकारणात मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हात टाकण्याचे धाडस कोणातही नाही. उलट त्यांना सलाम ठोकणारे खाकीतील काही अधिकारी व कर्मचारी धुळेकरांनी पाहिले आहेत. त्यामुळे धुळ्यातील ‘गुंडराज’संदर्भात सोशल मिडियावर अनेकदा वेगवेगळया प्रकारच्या कमेंटस होतांना दिसतात.
त्यात आता एटीएम पळवून नेल्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा धुळे चर्चेत आले आहे. नवीन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत हे रुजू होऊन दोन दिवस झाले आणि त्यातच ही घटना घडल्याने चोरटयांनी थेट अधीक्षकांनाच आव्हान दिले, असे नागरिकांकडून सांगितले जात आहे. ही घटना आणि धुळ्यातील अवैध धंद्याची जंत्री पाहता यावर आवर घालणे, हे खरंच त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. त्यांनी अधीक्षक पदाची जबाबदारी स्विकारतांना आपण धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा नायनाट करु. तसेच अवैध धंदे बंद करु, असे सांगितले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच करुन दाखवावे, अशी अपेक्षा धुळयातील सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title:  ATM machine lifted.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे