नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पारोळा रोडवर शहरानजिक हॉटेल शांतीसागर आहे. या हॉटेलच्या पाठीमागे भिलाटी आहे. या भागात राहणारा अनिल मुरलीधर भील (१७) आणि अजय साहेबराव भील (१८) हे दोघे सोमवारी सकाळी अन्वरनाला केटीवेअर बंधाऱ्याच्या भिंतीवरुन जात होेते. अचानक अनिल भील याचा तोल जाऊन तो केटीवेअरच्या पाण्यात जाऊन पडला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी म्हणून अजय भील याने देखील पाण्यात उडी मारली. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज दोघांनाही आला नाही. दोघेही पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती धुळे तालुका पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक कोते, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे, कर्मचारी शाम खलाणे, ज्ञानेश्वर शिंदे हे घटनास्थळी तातडीने दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य सुरु असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास अजय भील याचे पार्थीव हाती लागले. दुपारी उशिरापर्यंत अनिल भील याचा शोध लागलेला नव्हता. बचाव व शोध कार्य सुरु आहे.
अन्वर नाल्यात पडल्याने एक बुडाला, तर दुसरा बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST