धुळे/कापडणे : तब्बल दीड महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले. या भिजपावसाने पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे वातावरण होते. काही भागांत रिपरीप सुरू होती. दुपारी ३ वाजल्यानंतर पावसाने जोर पकडला तो सायंकाळपर्यंत कायम होता. त्यानंतर देखील भिजपाऊस सुरुच होता.यंदाच्या खरीप हंगामात ४ आणि १७ जूनला रोजी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारली. काही भागांत दुबार तर काही भागांत तिबार पेरणी करावी लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात काही ठिकाणी अधूनमधून पाऊस हजेरी लावत होता परंतु तो पिकांसाठी पुरेसा नव्हता. शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्याची परिस्थिती बिकट होती. पिके करपू लागली होती. त्यामुळे नैसर्गिक संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु मंगळवारच्या पावसाने पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी दुबार पेरणीमुळे झालेले नुकसान भरून निघणार नाही शिवाय उत्पन्न किती मिळते हे पिके हाती आल्यावरच स्पष्ट होणार आहे. कापडणे गावासह जिल्ह्यांत इतरही गावांच्या शिवारात पाऊस झाला. ‘पंढाय’ लागल्याने शेतकरी सुखावला. खानदेशातील ग्रामदेवता कानबाई मातेचा सोमवारी विसर्जन सोहळा आटोपल्यानंतर मंगळवारी पावसाचे आगमन झाले; परंतु पाऊस उशिरा झाल्याने पिकांच्या एकूण उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपेक्षाही जास्त घट येणार असल्याचे शेतकरी सांगतात.
नेर शिवारात जोरदार पाऊस
नेर : गेल्या दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावून श्रावण महिन्यात शुभसंकेत दिले. यामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेरसह परिसरात गेल्या दीड महिन्यांपासून पाऊस लांबलेला होता. वारा आणि उन्हामुळे पिके करपू लागली होती. विहिरींची पातळी ही खोल गेली होती. कोरडवाहू शेतकरी हतबल होऊन आकाशाकडे डोळे लावून बसला होता. पिके वाचविण्यासाठी अक्कलपाडा धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरत होती. पाणीही सोडले गेले होते. सुदैवाने मंगळवारी चार वाजता अचानक वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास झालेल्या या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे श्रावण महिना सुरू असल्याने महिन्याभरात चांगला पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आता वाटू लागली आहे.
मालपूरसह शिंदखेडा तालुक्यात पावसाचे आगमन
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह तालुक्यात मंगळवारी दुपारी तीन वाजता पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. पिके करपली होती. पशुधनासाठी चाऱ्याचादेखील प्रश्न गंभीर बनला असता; परंतु या संततधार पावसामुळे पिकांना तर जीवदान मिळालेच आहे शिवाय चाऱ्याचाही प्रश्न सुटणार आहे.