दरम्यान, जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या असून, त्यावर कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या चालकांना दरमहा १२ हजार रुपये महिना वेतन दिले जाते. जिल्ह्यातील नेर, नगाव, बोरकुंड, लामकानी, चिमठाणे, छडवेल, नरडाणा, वालखेडा, कुसुंबा, कळंबनीर या ठिकाणच्या आरोग्य केंद्रात असलेल्या रुग्णवाहिकांवर कंत्राटी चालक आहे. या चालकांना गेल्या मार्चपासून पगार मिळालेला नाही, असे चालकांचे म्हणणे आहे. चार महिन्यांपासून पगार नसल्याने, या चालकांवर आता उपासमारीचे वेळ आलेली आहे. काही चालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी सीईओंची भेटही घेऊ दिली नाही. जिल्हा आरोग्य अधिकारीही याकडे लक्ष देत नसल्याचे या चालकांचे म्हणणे आहे.
कोरोना काळात इतर सर्व विभागांपेक्षा आरोग्य विभागाला सर्वाधिक निधी मिळालेला आहे. तो आरोग्यावर खर्च करण्यात आला असला, तरी आरोग्य यंत्रणेचेच काम करणाऱ्या या चालकांना पगारापासून वंचित ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कंत्राटी चालकांचे पगार त्वरित करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.