लोकमत न्यूज नेटवर्कन्याहळोद : पंचायत समिती धुळे अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामार्फत गर्भवती महिलांना शासनाकडून मोफत बेबी केअर किटचे वितरण करण्यात आले.जि.प. महिला व बालविकास विभागाच्या सभापती धरती देवरे, जि.प. सदस्य राम भदाणे यांच्याहस्ते पंचायत समिती सभागृहात १४ रोजी गर्भवती मातांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती प्रा.विजय पाटील, उपसभापती विद्याधर पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, सहायक गटविकास अधिकारी गौतम सोनवणे, बालविकास प्रकल्प अधिकारी हेमंत भदाणे यांनी केले.याप्रसंगी पंचायत समितीच्या वतीने सभापती धरती देवरे व जि.प. सदस्य राम भदाणे यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत धुळे तालुक्यात सुमारे १८०० बेबी केअर किटचे वाटप करण्यात येणार असल्याचे भदाणे यांनी सांगितले.बेबी केअर किटमध्ये एकूण १७ प्रकारच्या वस्तू आई व बालकांसाठी आहेत. त्यात गादी, बेडशीट, नेलकटर, हातमोजे, मच्छरदाणी, खेळणी, मालीश करण्यासाठी तेल अशा वस्तूंचा समावेश आहे.सदर योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांसाठी काही निकष लावण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधण्याचे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी हेमंत भदाणे यांनी केले आहे.
महिलांना बेबी केअर किट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 12:01 IST