शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी गटारी नसल्याने नळाचे व सांडपाणी रस्त्यावर येऊन डबके साचते. त्यामुळे कायमस्वरूपी येथील परिसर अस्वच्छ असल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत स्थानिक नगरसेवकांना वेळोवेळी समस्या सोडविण्याची मागणी केली; मात्र अद्याप प्रश्न सुटू शकला नाही.
येथील हिरामण थोरात यांच्या घरापासून ते भावडू निस्ताने यांच्या घरापर्यंत अशा परिसरात सांडपाण्याच्या गटारी तयार करण्यात याव्या, या भागात तयार करण्यात आलेला रस्त्यावर ठिकठिकाणी डबके साचत असल्याने ते तातडीने बुजण्यात यावे. समस्या मार्गी लावण्याबाबत येथील नागरिकांनी यापूर्वी मनपाला निवेदन दिले आहे. मात्र निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रशासनाने १५ दिवसात स्मरणपत्राची दखल घ्यावी अन्यथा प्रभागातील नागरिकांसोबत उपोषणाला बसू, अशा इशारा दिनेश महानोर, दत्तू गाेवेकर, कमलाकर महानोर, संतोष गवळी, हिरामण थोरात, संजय गायकवाड, विजय थोरात, उत्तम महानोर, गंगाराम गवळी आदींनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून दिला आहे.