धुुळे : शिंदखेडा तालुक्यातील हातनुर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. या ग्रामपंचायतीची स्थापना २३ मार्च १९५६ रोजी झाल्यापासून २०१५पर्यंत तब्बल ५९ वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या ग्रामपंचायतीवर तीन वर्ष भाजपची सत्ता होती.
१९५६ सालातील गावाच्या लोकसंख्येनुसार सुरुवातीला तीन प्रभागांतून ९ सदस्य निवडून येत होते. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून सलग ३५ वर्ष दंगल राघो बागुल यांनी सरपंचपद भूषविले होते. त्यानंतर दगा बुधा पाटील, साहेबराव गोविंदा पाटील, भिवराज नंदराव बागुल, निंबा दयाराम निकम, प्रेमराज जयदेव महाले, पुजाबाई विश्वास निकम, बन्सीलाल जयदेव निकम, जयवंताबाई हिलाल पाटील, आशाबाई नारायण निकम, दीपक नारायण जगताप (प्रभारी) अशा ५९ वर्षांच्या कालखंडात काँग्रेस व त्यांनतर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता या ग्रामपंचायतीवर होती. त्यानंतर दंगल राघो बागुल यांचे सुपुत्र वाल्मिक बागुल यांनी भाजपत प्रवेश केल्याने राजकीय समिकरणात बदल होत गेला. त्यांनतरच्या दोन वर्षांसाठी २०१५ ते २०२०पर्यंत कल्पनाबाई अमृत पाटील या भाजपच्या सरपंच आहेत.
राजकारणात दुसरी पिढी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेत दंगल बागुल हे सुरुवातीचे ३५ वर्ष सरपंच होते. त्यांनतर त्यांची दुसरी पिढी राजकारणात आली आहे. वाल्मिक बागुल व पत्नी०००० बागुल यांनी २०१५ ते २०२०मध्ये ग्रामपंचायत सदस्य होते.
२५ वर्ष मराठ्यांच्या हाती सत्ता
१९९५ ते २०२०पर्यंत ग्रामपंचायतीवर काॅंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकाळापर्यंत २५ वर्ष जगताप कुटुंबियांकडे उपसरपंचपद होते. सुरुवातीच्या काळात शेषराव भाेसले ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते. त्यानंतर अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळाला, यासाठी पदकोर गिरासे यांना संधी देण्यात आली. त्यानंतर पुन्हा जगताप कुटुंबातून बाबुराव मराठे, खुशाल जगताप, दीपक जगताप असे आतापर्यंत उपसरपंच झालेले आहेत.
चार महिलांना सरपंचपदाचा मान
ग्रामपंचायतीच्या ६५ वर्षांच्या काळात पुजाबाई विश्वास निकम, जयवंताबाई हिलाल निकम, आशाबाई नारायण निकम व कल्पना अमृत निकम अशा चार महिला सरपंच होऊन गेल्या आहेत.
१३ जातींपैकी काही जाती राजकारणापासून दूरच
गावाची सुमारे सहा हजार लोकसंख्या आहे तर मतदारांची संख्या ३ हजार २०० आहे. त्यानुसार सध्या ११ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गावात १३ विविध जाती आहेत. त्यामध्ये पाटील, जगताप, आदिवासी, न्हावी, नगराळे अशा मुख्य पाच जातीमधील उमेदवारांना निवडणुकीत स्थान मिळालेले आहे. तर माळी, कोळी, वडार तसेच इतर पाटील समाजातील लहान बोरसे, आहिरे व अन्य जाती व पोटजातींना राजकीय वारसा नाही. त्यामुळे ६४ वर्षांत एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नाही.
अल्पसंख्याक उमेेदवाराला सर्वाधिक मते
२०१५मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सर्वात्रिक निवडणुकीत प्रभाग १ मधून निवडणूक लढवलेले भगवान कुमावत ७०० मतांच्या प्रभागातून आतापर्यंत सर्वाधिक ४७० मते मिळवत निवडून आले आहेत. आतापर्यंत एकही निवडणूक बिनविराेध झालेली नाही. तसेच त्यासाठी प्रयत्नही करण्यात आलेला नाही.