रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:49+5:302021-04-14T04:32:49+5:30

जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत ३४ हजारांच्यावर रुग्ण आढळून आले आहेत़ त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दहा ते ...

Affordability of patient relatives for remedivir | रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची परवड

रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची परवड

Next

जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत ३४ हजारांच्यावर रुग्ण आढळून आले आहेत़ त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दहा ते १५ हजारांच्या आसपास आहे़ कोरोना आजारावरील औषधांचाही मोठा खप वाढला आहे़ त्याचाच फायदा आता औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांनी उचलला असल्याचे समोर येत आहे़ जिल्ह्यात शेजारील राज्यांतून रेमडेसिविर या लसीचा पुरवठा करण्यात येत आहे़ चोरीछुपे मार्गाने या लसी जिल्ह्यात आणल्या जात आहे़ या लसी कोणीतरी कुठेतरी लपवून ठेवल्या असल्याने साहजिकच त्याचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली होती़ त्याचमुळे लसीचा कोणी काळाबाजार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी संजय यादव आणि पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना देण्याची वेळ आली़ यावरून कुठेतरी तुटवडा जाणवत असल्याचे अधोरेखित होत आहे़ अशी स्थिती एकीकडे असताना दुसरीकडे औषध प्रशासन मात्र सावध भूमिका बाळगताना दिसत आहे़ तक्रार नाही तर कारवाई करायची कशी, असा उपरोधिक सवाल उपस्थित होऊ लागला़

रेमडेसिविर इंजक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णांचे नातेवाईक या लसीसाठी हवे तेवढे पैसे मोजायला तयार आहेत़ मात्र, लस मिळणे दुरापास्त झाले आहेत़ गत आठवड्यातच या लसीसाठी लक्षावधी रुपयांची उलाढाल झाली़ मात्र, तक्रार नाही तर कोणाला पार्टी बनवायचे, असा सूर आता व्यक्त होऊ लागला आहे़ रेमडेसिविर इंजेक्शनसाठी जिल्ह्यातील रुग्णांची धावपळ सुरू असताना बाहेरगावांहून अनेकांना इंजेक्शनबाबत विचारणा केली जात आहे़ ही लस जवळच असलेल्या शिरपूर येथे मिळत असल्याने सर्वांचा ओढा शिरपूरकडे असल्याचे दिसून येत आहे़ मात्र, शिरपूरकडूनही पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे़

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या वाढत आहे़ शासकीय आरोग्य यंत्रणा व खासगी रुग्णालयांवर ताण वाढला आहे़ रुग्ण व त्यांचे नातेवाईक काही ठिकाणी आग्रह करताना दिसून येतात़ सध्या बाजारात रेमडेसिविरचा तुटवडा असून कोरोनाच्या सर्वच रुग्णांना या इंजेक्शनची आवश्यकता नाही़ इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे अधिक सोयीचे ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे़

काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक तैनात

रेमडेसिविरचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ दिवसेंदिवस शहरासह जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने रेमडेसिविरच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे़ परिणामी मागणी वाढत असल्याने काळाबाजाराचे प्रमाण वाढले आहे़ हे प्रमाण रोखण्यासाठी भरारी पथकाला खूप काम करावे लागणार आहे़

कोरोना झाल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या भावाला डॉक्टरांनी रेमडेसिविर इंजेक्शन सुचविले आहे़ रुग्णालयाकडून ते उपलब्ध होत नसल्याने आम्हाला शोधाशोध करावी लागत आहे़ प्रशासनाकडे मागणी करणार आहे़

- रुग्णाचे नातेवाईक

कोरोनाच्या संकट काळात औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत़ जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार भरारी पथक तयार करण्यात आले आहे़ एलसीबीच्या पथकाने औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना जेरबंद केले आहे़ त्यामुळे इतरांवर धडकी भरणार आहे़ ज्यावेळेस माहिती मिळेल त्यावेळेस कारवाई केली जाईल़ नागरिकांच्याही लक्षात आल्यास त्यांनीही तक्रार करावी़

- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक

Web Title: Affordability of patient relatives for remedivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.